दहशतीच्या सावटाखाली असलेल्या नागरिकांची पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव
तपास अधिकारी आरोपीला अटक न करता पाठिशी घालत असल्याचा आरोप
नगर (प्रतिनिधी)- अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या व दोन महिन्यांपूर्वी जुन्या वादातून चेतन रविंद्र निदाणे (वय 26 वर्षे) यांच्यावर चॉपर, तलवारीने जीव घेणा हल्ला करणारा आरोपी जितू सुरेश चव्हाण याला अटक करण्याच्या मागणीसाठी नालेगाव येथील म्युनसीपल कॉलनी राहणारे समस्त नागरिकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालात मोठ्या संख्येने येऊन अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांना निवेदन दिले. तर चेतन निदाणे मारहाण प्रकरणाच्या तपासात संशय व्यक्त करुन तपास अधिकारी बदलण्याची मागणी केली. यावेळी शितल सारसर, जिनी ड्युटे, उषा साठे, सोनाली रोहकले, सविता साळुंके, सुनील शेंडगे, संतोष खरारे, राजेश खरारे, अनिल वाणे, मुन्ना शेख, प्रशांत दळवी, अनिकेत साळुंके, आदर्श साळुंके, अयान शेख, विकी उजागरे, सिद्धांत वाघचौरे, गणेश पवार, राहुल रोहोकले, गणेश भुजबळ, हर्षल सारसर, युवराज सारसर आदींसह नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
चेतन निदाणे यांना झालेल्या मारहाण प्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनला कलम 109, 115 (2) इत्यादी कलमासह आर्म ॲक्ट 4/25 नुसार या प्रकरणामधील मुख्य आरोपी जितू चव्हाण व इतर आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. मात्र यामधील मुख्य आरोपी जितू चव्हाण हा कुख्यात गुंड असून, त्याच्याविरुद्ध इतरही गंभीर गुन्हे परिसरातील पोलीस स्टेशनला दाखल आहेत. या प्रकरणात दोन महिने उलटून देखील पीएसआय असलेले तपासाधिकारी आरोपी यांना अटक करत नाही, त्यांना आरोपीचा ठाव ठिकाणा सांगूनही ते अटक करण्यास टाळाटाळ करुन उडवा उडवीची उत्तरे देत आहे.
आरोपी जितू चव्हाण याचा अटकपूर्व जामीन जिल्हा व सत्र न्यायालय एक महिन्यापूर्वी फेटाळलेला असून, संबंधित तपास अधिकारी आरोपीला अटक करण्यासाठी कोणतेही कष्ट घेत नाहीत. तपास अधिकारी यांच्याकडे सदर प्रकरणाची माहिती घेण्यासाठी साक्षीदार गेले असता, आरोपी विरुद्ध पुरावा नाही, त्याचा मी नील रिपोर्ट दाखल करणार आहे. तुमच्या विरुद्ध बी समरी रिपोर्ट दाखल करणार आहे! अशा स्वरूपाच्या बतावण्या करून फिर्यादीच्या नातेवाईकांचे मानसिक खच्चीकरण करत असल्याचे निवेदनात म्हंटले
आरोपी हा शहरामध्ये राजरोसपणे फिरत असून, त्यास अटक करण्यात आलेली नाही. आरोपीला अटक होत नसल्याने परिसरातील नागरिक व फिर्यादीचे नातेवाईक दहशतीच्या सावटाखाली जगत आहे. तपास अधिकारी आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रकार करत आहे. या प्रकरणात निपक्षपातीपणे तपास होताना दिसत नाही. आरोपीविरुद्ध प्रत्यक्षदर्शी पुरावा, घटनेतील जखमी झालेल्या फिर्यादीचा पुरावा इतर तत्सम सबळ पुरावे असतानाही केवल आरोपीला पाठीशी घालण्याच्या उद्देशाने हा प्रकार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आरोपीचे बेकायदेशीर सावकारी, जागेवर ताबा मारणे, मारहाण आदी अनेक गंभीर प्रकार सातत्याने सुरु आहे. या विरोधात पोलिसांनी कारवाई न केल्यास सर्व परिसरातील नागरिकांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास दुसऱ्या प्रामाणिक आणि सक्षम पोलीस अधिकारी यांच्याकडे वर्ग करावा व आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.