नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार
कास्ट्राईब महासंघ कर्मचाऱ्यांच्या न्याय-हक्कासाठी कार्यरत -एन.एम. पवळे
नगर (प्रतिनिधी)- कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवड करण्यात आली. जिल्हा परिषदेतील कास्ट्राईब महासंघाच्या कार्यालयात राज्य अध्यक्ष एन.एम. पवळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. या कार्यक्रमात नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
नाशिक विभागीय उपाध्यक्षपदी राजीव यशवंत साळवे, जिल्हा कार्याध्यक्षपदी समीर वाघमारे, शहरात उपाध्यक्षपदी विनोद बाळू शिंदे व कार्यालयीन जिल्हा सचिव पदी बाळू राधू शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी राज्य उपाध्यक्ष वसंत थोरात, शहराध्यक्ष श्याम गोडळकर, लखन गाडे, सागर पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
एन.एम. पवळे म्हणाले की, कास्ट्राईब महासंघ कर्मचाऱ्यांच्या न्याय-हक्कासाठी कार्यरत आहे. महासंघाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यात आलेले आहेत. महासंघ सामान्य कर्मचाऱ्यांच्या अडचणी, अन्याय आणि प्रशासकीय समस्यांच्या विरोधात ठामपणे त्यांच्या पाठिशी उभे राहिलेला आहे. नवीन पदाधिकारी देखील कर्मचाऱ्यांच्या न्याय, हक्कासाठी संघटनेच्या माध्यमातून संघर्ष करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नाशिक विभागीय उपाध्यक्ष राजीव साळवे हे एसटी महामंडळ मध्ये विभाग नियंत्रक म्हणून कार्यरत होते. कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते सातत्याने योगदान देत आहेत. जिल्हा कार्याध्यक्ष के.के. जाधव यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या रिक्तपदावर समीर वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली असून, जिल्हा परिषदेत यांत्रिकी विभागात (पाणीपुरवठा) कार्यरत आहेत. शहर उपाध्यक्ष विनोद शिंदे महापालिकेत आरोग्य विभागात तर कार्यालयीन जिल्हा सचिव बाळू शिंदे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात कार्यरत आहेत.
या बैठकीत संघटनेसमोरील आव्हाने, वेतन, प्रमोशन, सेवा सुरक्षा, बदल्या, पेंशन आदी प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन संघटनेला बळ देण्याचे आवाहन उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केले. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
