मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख व नगर शाखेच्या वतीने सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेच्या राज्य कार्यकारणीत नगरचे आफताब मन्सूर शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी पिंपरी चिंचवड येथे झालेल्या कार्यक्रमात शेख यांच्या नियुक्तीची घोषणा करुन त्यांचा सत्कार केला.

आफताब शेख यांची राज्य कार्यकारणीत नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा मराठी पत्रकार परिषद जिल्हा शाखेच्या वतीने पत्रकारांच्या अधिस्विकृती समिती नाशिक विभागाचे सदस्य विजयसिंह होलम यांनी सत्कार केला. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस मन्सूर शेख, राज्य प्रसिध्दी प्रमुख संदीप कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष सुर्यकांत नेटके, लहू दळवी आदी उपस्थित होते.
डिजिटल मीडियात काम करणाऱ्या पत्रकारांची डिजिटल मीडिया परिषद या नावाने स्वतंत्र शाखा मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने सुरू करण्यात आली आहे. डिजिटल मीडियाची स्वतंत्र कार्यकारिणी करण्याचा निर्णयही परिषदेने घेतला आहे. त्यानुसार काही पदांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. डिजिटल मीडिया परिषदेचे पहिले राज्य अध्यक्ष म्हणून बीडचे जिल्ह्यातील पत्रकार अनिल वाघमारे यांची तर कार्याध्यक्ष म्हणून सातारा येथील पत्रकार संतोष उर्फ सनी शिंदे यांची व उपाध्यक्षपदी शेगाव येथील पत्रकार अनिल उंबरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कार्यकारिणी सदस्य म्हणून नगर येथील न्यूज टू डे 24 चे संपादक आफताब मन्सूर शेख, माथेरानमधील महाराष्ट्र न्यूज 24 तासचे संपादक मल्हार संतोष पवार, बीड येथील वास्तव अपडेटचे संपादक जितेंद्र शिरसाट, डिबीसी न्यूज चंदगडचे संपादक अनिल नयनसुख धुपदाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 11 जणांची ही कार्यकारिणी असेल. उर्वरित सदस्यांची लवकरच नियुक्ती करण्यात येईल, असे एस.एम. देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
डिजिटल मीडिया परिषद ही पूर्णपणे मराठी पत्रकार परिषदेच्या अखत्यारित असेल. ही कार्यकारिणी मराठी पत्रकार परिषदेला उत्तरदायी असेल असेही एस.एम.देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, राज्य सरचिटणीस मन्सूर शेख, राज्य प्रसिद्धीप्रमुख संदीप कुलकर्णी यांनी अभिनंदन केले आहे.