• Wed. Feb 5th, 2025

अहिल्यानगर आयकर कार्यालयाच्या उपायुक्त पदावर भूमिका सैनी यांची नेमणूक

ByMirror

Feb 1, 2025

आयकर विभागाच्या फेसलेस योजनेचा करदात्यांनी लाभ घ्यावा -भूमिका सैनी (आयकर उपायुक्त)

अहमदनगर टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने सत्कार

नगर (प्रतिनिधी)- भारत सरकारने करदात्यांना अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि निर्भय कर प्रणाली प्रदान करण्यासाठी फेसलेस योजना सुरू केली. ही योजना कर प्रशासन सुधारण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. फेसलेस योजनेचा करदात्यांनी लाभ घेण्याचे आवाहन आयकर उपायुक्त भूमिका सैनी यांनी केले.


अहिल्यानगर आयकर कार्यालयाच्या उपायुक्त पदावर भूमिका सैनी यांची नेमणूक झाल्याबद्दल अहमदनगर टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याप्रसंगी सैनी बोलत होत्या. याप्रसंगी सहा. आयुक्त अशोक मुराई, टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष किशोर गांधी, उपाध्यक्ष सुनील कराळे, नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्सचे सचिव आनंद लहामगे, ॲड. पुरुषोत्तम रोहिडा, अमित पितळे, अंबादास गाजुल, सीए अजय मुथा आदी उपस्थित होते.


फेसलेस योजनेमुळे, करदाता आणि आयकर अधिकारी यांच्यात थेट संपर्क न ठेवता संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन होते. तसेच संगणकीकृत प्रणालीद्वारे प्रकरणे यादृच्छिकपणे (रॅन्डम अलोटमेंट) विभागली जातात. यातील अपील प्रक्रिया ही सुद्धा पूर्णपणे डिजिटल असल्याची माहिती आयकर उपायुक्त सैनी यांनी दिली.


फेसलेस योजना म्हणजे आयकर प्रक्रियेत डिजिटल परिवर्तनाचे उत्तम उदाहरण आहे. या योजनेमुळे करदात्यांना जलद आणि सोपी सेवा मिळते, तसेच संपूर्ण व्यवस्थेत पारदर्शकता येते. यामुळे कर भरण्याच्या प्रक्रियेत अधिक विश्‍वासार्हता निर्माण होते आणि भारतातील कर प्रशासन अधिक प्रगत होणार असल्याचेही सैनी यांनी सांगितले.



फेसलेस योजनेची नवीन कर प्रणाली प्रटॅक्स प्रॅक्टिशनर्स व सीए यांच्या दृष्टीकोनाने फायद्याची ठरणार आहे. याचा लाभ व्यापारी, उद्योजकांसह सर्वसामान्यांना देता येणार आहे. कर दात्यांसाठी ही योजना फायद्याची ठरणार आहे. नुकतेच सादर करण्यात आलेले बजेट व्यापारी व उद्योजकांना चालना देणारे आहे. तर मध्यमवर्गीयांचा विचार करुन त्यांना आर्थिक सक्षम बनविणारे उद्दीष्टांचा यामध्ये समावेश आहे. -आनंद लहामगे (सचिव, नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *