• Wed. Oct 15th, 2025

विद्यार्थ्यांना कॉपीमुक्तीसाठी केले आवाहन

ByMirror

Feb 20, 2025

अहिल्यानगरचा कॉपीमुक्ती परीक्षा पॅटर्न राज्याने अंगीकारावा -प्रवीण दराडे

सचिवांनी एकाच वेळी अनुभवले सुमारे 63 हजार विद्यार्थ्यांचे कॉपीमुक्त परीक्षा संचलन

नगर (प्रतिनिधी)- राज्याच्या बोर्ड परीक्षेच्या भयमुक्त, कॉपीमुक्त व निकोप वातावरणातील परीक्षा उपक्रमासाठी अहिल्यानगर जिल्ह्याने प्रचंड मेहनत घेतलेली आहे. शिक्षण, पोलीस प्रशासन व महसूल विभागाने समन्वय साधून कॉपीमुक्तीचे केलेले काम राज्याला निश्‍चितच आदर्श ठरेल आहे. एकाच वेळी 63 हजार विद्यार्थ्यांचे कॉपीमुक्त परीक्षेचे यशस्वी संचलन ही राज्यासाठी विशेष बाब आहे. विद्यार्थ्यांनी देखील परीक्षांमध्ये कॉपी न करता जीवनात यश संपादन करावे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ संकल्पनेतील अहिल्यानगरचा आनंददायी परीक्षा पॅटर्न राज्याने निश्‍चितच अंगीकारण्याचे आवाहन अहिल्यानगरचे पालक सचिव तथा प्रधान सचिव (सहकार व पणन विभाग, मंत्रालय) प्रवीण दराडे यांनी केले.


जिल्हाधिकारी कार्यालयात विविध बैठकांचे आयोजन दराडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या दरम्यान त्यांनी कार्यालयातील परीक्षेच्या विशेष वॉर रूमला सुमारे अर्ध्या तासाची विशेष भेट देऊन कॉपीमुक्तीच्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती जाणून घेतली. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, मनपा आयुक्त यशवंत डांगे, प्रांताधिकारी सुधीर पाटील तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.


दहावी- बारावीच्या सर्व पेपरसाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त व शिस्तीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे मार्गदर्शन लाभत आहे. शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या मार्गदर्शनाने कार्यरत जिल्हास्तरीय दक्षता समितीच्या मास्टर प्लॅन अंतर्गत निर्मित या पॅटर्नच्या वेबपेजचे दराडे यांनी विशेष कौतुक केले.


शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी वॉररूमबद्दल व कॉपीमुक्तीच्या जनजागरण उपक्रमाबद्दल माहिती दिली. उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर यांनी 109 केंद्रातील 1585 ब्लॉकमधील 63 हजार विद्यार्थ्यांचे कॉपीमुक्त संचलन कसे होते याचे प्रात्यक्षिक दाखवले. या उपक्रमाची दराडे यांनी विशेष माहिती घेत हा पॅटर्न अजून आदर्श होण्यासाठी मार्गदर्शक सूचना केल्या.


शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे (योजना), शिक्षण निरीक्षक श्रीराम थोरात, सुरेश ढवळे, वॉर्ड रूम संचालक लहू गिरी, जितिन ओहोळ, भावेश परमार, तांत्रिक सहाय्यक डॉ.अमोल बागुल आदींनी यावेळी मॉनिटरिंग उपक्रमात सहभाग दर्शवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *