जमशेदपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड
नगर (प्रतिनिधी)- ॲमेचर पॉवरलिफ्टिंग असोसिएशन (महाराष्ट्र) च्या वतीने नुकत्याच मुंबई, उरण येथे अनिक्विपेटेड पॉवरलिफ्टिंग ॲण्ड बेंच प्रेस चॅम्पियनशिप ही राज्यस्तरीय स्पर्धा पार पडली. यामध्ये शहरातील अनुराधा मिश्रा यानी उत्कृष्ट कामगिरी करुन चार सुवर्ण पदक पटकाविले. त्यांची जमशेदपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
या स्पर्धेत राज्यातील महिला खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. पॉवरलिफ्टिंग व बेंच प्रेस मध्ये मिश्रा यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करुन दोन्ही प्रकारात प्रत्येकी दोन सुवर्ण पदकांची कमाई केली. मिश्रा यांना नुकतेच झालेल्या सदर स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे अध्यक्ष तथा शिवछत्रपती पुरस्कार विजेते तुषार दारकर, सचिव तथा शिवछत्रपती पुरस्कार विजेते संतोष शिंदे, राष्ट्रीय पंच निशा शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. मिश्रा या सावेडी येथील जिम स्ट्राईकर मध्ये प्रशिक्षक स्वप्निल मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.