बोचरे कुटुंबीयांची आरोपींवर कठोर कारवाईची मागणी
गुन्हेगार मोकाट, जीवाला धोका; जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन
नगर (प्रतिनिधी)- जीवे मारण्याच्या प्रयत्नात प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी फिर्यादी शांता अमोल बोचरे व त्यांच्या कुटुंबीयांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तर सदर आरोपींकडून वारंवार हल्ले होत असल्याने कुटुंबीयांना धोका निर्माण झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शांता बोचरे यांच्या फिर्यादीवरून 17 एप्रिल रोजी नगर तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित आरोपी व इतर आठ ते दहा इसमांनी जबर मारहाण करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतरही आरोपींवर ठोस कारवाई झाली नाही.
29 एप्रिल रोजी पुन्हा एकदा, बोचरे दांम्पत्य गाडीवरून जात असताना आरोपींनी गाडी अडवली आणि कोयत्यासह आठ ते दहा इसमांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात शांता बोचरे यांच्या गळ्यातील तीन तोळ्यांचे सोन्याचे गंठण हिसकावून घेण्यात आले. पतीवर लोखंडी गज, लाकडी काठ्या व कोयत्याने वार करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. पती गंभीर जखमी झाले असून, सुदैवाने ते थोडक्यात बचावले.
पोलीस प्रशासन आरोपींवर कठोर कारवाई न करत असल्यामुळे त्यांचा जीव धोक्यात आला आहे. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देत, या गुंड प्रवृत्तीच्या आरोपींवर तात्काळ आणि कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. गुन्हेगार मोकाट असल्याने संपूर्ण कुटुंबीयांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.