• Wed. Oct 15th, 2025

जिल्हा परिषदेत अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांचे धरणे

ByMirror

Aug 4, 2025

एफ.आर.सी.मुळे टीएचआर वाटपासाठी उडालेला गोंधळ, निकृष्ट आहाराचा अंगणवाडी सेविकांना मनस्ताप


प्रलंबीत मागण्यासांठी जोरदार निदर्शने

नगर (प्रतिनिधी)- पोषण ट्रेकर ॲपद्वारे टीएचआर वाटप करताना फेस रिकगनायझेशन सिस्टिममुळे (एफ.आर.सी.) उडालेला गोंधळ, निकृष्ट आहार, वेतनश्रेणी, महागाई भत्ता व मानधन वाढच्या प्रश्‍नासंदर्भात अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी युनियनच्या वतीने जिल्हा परिषदेत धरणे आंदोलन करून जोरदार निदर्शने करण्यात आली. जिल्ह्यातील मोठ्या संख्येने आंदोलनासाठी एकत्र आलेल्या अंगणवाडी सेविकांच्या घोषणांनी जिल्हा परिषद परिसर दणाणला.


या आंदोलनात संघटनेचे सरचिटणीस कॉ. राजेंद्र बावके, अध्यक्षा कॉ. मदिना शेख, सहचिटणीस जीवन सुरडे, मायाताई जाधव, सविता दरंदले, मन्नाबी शेख, निर्मला चांदेकर, भगीरथी पवार, शोभा पवार, रतनताई गोरे, अलका दरंदले, शोभा विसपुते, सुनिता बोर्डे, सुनिता कुंडारे, संगीता विश्‍वास, शशिकला औटी, सुनिता पवार, शोभा विसपुते, अलका दरंदले, शोभा येवले, भारती बोरुडे, प्रतिभा जोशी आदींसह अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.


एकात्मिक बाल विकास सेवा योजनेद्वारे सहा महिने ते तीन वर्षे या वयोगटातील लाभार्थ्यांना टीएचआर वाटप केला जातो. या अगोदर पालकांचे रजिस्टर सह्या घेऊन टीएचआर वाटप केला जात होता, परंतु आता दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पोषण ट्रॅक्टरमध्ये फेस रिकगनायझेशन सिस्टिममुळे त्याचे वाटप करण्याच्या सूचना अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार एप्रिल 2025 या महिन्यात राज्यातील अंगणवाडी सेविकांनी पोषण ट्रॅकर ॲप मध्ये फेस रिकगनायझेशन सिस्टिममुळेद्वारे टीएचआर वाटप करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परिणामी टीएचआर वाटप करणे अशक्य झाले आहे.


ग्रामीण आदिवासी भागात पुरेसे नेटवर्क मिळत नसल्यामुळे पोषण ट्रॅकर ॲप चालत नाही. देशभरातील अंगणवाडी सेविकांना फेस रिकगनायझेशन सिस्टिममध्ये काम करण्याची वेळ एकच असल्यामुळे नेमून दिलेल्या वेळेत त्यामध्ये फोटो अपलोड होत नाही. आधारशी अनेक पालकांनी मोबाई नंबर संलग्न केलेले नाही व काही पालक उपस्थित नसल्याने ओटीपी मिळू शकत नाही. सर्वर डाऊन असल्यामुळे व नेटवर्क नसल्यामुळे काम करताना अंगणवाडी सेविकांना अडचणी येत आहेत, तर तासंनतास ताटकळत बसावे लागत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


अंगणवाडी केंद्रात लाभार्थ्यांना देण्यात येत असलेला आहार निकृष्ट दर्जाचा असून, त्याबाबत पालकांच्या मोठ्या तक्रारी येत आहेत. पालक टीएचआर स्वीकारण्यास नकार देत असल्याने कर्मचारी व लाभार्थी पालक यांच्यात वाद होत आहेत. अनेक ठिकाणी मृत साप, पाली, अळ्या, झुरळे टीएचआर मध्ये सापडल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीत अति उष्णतेमुळे किंवा गावी गेल्यामुळे बालकांची उपस्थिती रोडावते त्यामुळे ते आहारापासून वंचित राहतात.

त्यामुळे उन्हाळ्याचे दोन महिने त्यांना शिजवलेले आहार न देता, कोरडा शिधा द्यावा. या काळात पोषण ट्रॅकर मध्ये फोटोची अट लावू नये, एक हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या विभागात लोकसंख्येनुसार नवीन अंगणवाड्या मंजूर कराव्या, दूरवरच्या वाड्यावर लोकसंख्येचा निकष न लावता स्वतंत्र पूर्ण अंगणवाडी केंद्र मंजूर करण्याचे निवेदनात म्हंटले आहे.


तसेच अंगणवाडी सेविका मदतनीस यांना तीन व चार वर्गाचे कर्मचारी घोषित करून त्यांना त्याप्रमाणे वेतनश्रेणी, महागाई भत्ता व अन्य सर्व भत्ते तसेच ग्रॅच्युइटी, भविष्य निर्वाह निधी, मासिक पेन्शन आदी सामाजिक सुरक्षा लागू कराव्या, संपाच्या काळात व त्यानंतर वेळोवेळी झालेल्या वाटाघाटीमध्ये मान्य केल्यानुसार सेविका मदतनीसंना संपूर्ण 5000 व 3000 रुपये मानधन वाढ लागू करावी, प्रोत्साहन भत्ता लागू करण्याचा शासनाने एकतर्फी घेतलेला निर्णय मागे घ्यावा, राज्य शासनाने मान्य केल्याप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने लागू केलेल्या ग्रॅच्युइटीची अंमलबजावणी करावी, कृती समितीशी झालेल्या वाटाघाटी मध्ये मान्य केल्यानुसार मासिक पेन्शन योजना ताबडतोब मंजूर करून ती लागू करण्यासंदर्भात राज्यपातळीवरील मागण्यांचा समावेश होता. या मागणीचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला बालकल्याण) जायभाय यांना देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *