• Wed. Oct 29th, 2025

सदृढ पिढी घडविण्याचे कार्य आनंदऋषीजी हॉस्पिटल करत आहे -कुंदन कांकरिया

ByMirror

May 18, 2024

आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये बालकांची व महिलांची मोफत आरोग्य तपासणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- गरोदर मातांसह नवजात बालकांना उत्तमप्रकारे आरोग्य सुविधा उपलब्ध करुन सदृढ पिढी घडविण्याचे कार्य आनंदऋषीजी हॉस्पिटल करत आहे. भावी पिढीच्या सदृढ आरोग्यासाठी या हॉस्पिटलची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. अतिदक्षता विभाग, सर्व आरोग्य सुविधांनी सज्ज अद्यावत यंत्रणा व तज्ञ डॉक्टर समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सुविधा घेऊन जात असून, या सेवा कार्यात सहभागी होण्याचा अभिमान वाटत असल्याचे प्रतिपादन उद्योजक कुंदन कांकरिया यांनी केले.


जैन सोशल फेडरेशनद्वारा संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आयोजित स्त्रीरोग व बालरोग मोफत तपासणी शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी उद्योजक कांकरिया बोलत होते. यावेळी स्मिताताई कांकरिया, गितांजली कुवाड, श्रेयस कांकरिया, पूजा कांकरिया, डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ. सुधा कांकरिया, संतोष बोथरा, सुभाष मुनोत, डॉ. आशिष भंडारी, स्त्रीरोग तज्ञ डॉ. रविंद्र मुथा, डॉ. सोनल बोरुडे, बालरोग तज्ञ डॉ. श्रेयस सुरपुरे, डॉ. सोनाली कणसे, डॉ. वैभवी वंजारे, पेडिएट्रिक सर्जन डॉ. रुपेश सिकची आदी उपस्थित होते.


प्रास्ताविकात संतोष बोथरा म्हणाले की, आनंदऋषीजी हॉस्पिटल मध्ये नवजात शिशु अतिदक्षता विभाग (एनआयसीयू) सर्व सुविधांनी सज्ज करण्यात आला आहे. तर गरोदर मातांची देखील उत्तमप्रकारे काळजी घेतली जात आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठे एनआयसीयू सेंटर या हॉस्पिटलमध्ये कार्यान्वित असून, 3 तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली अनुभव असलेले कर्मचारी सेवा देत आहेत. महिलांसाठी 2 स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली गरोदर महिलांचे आरोग्य जपले जात आहे. आरोग्यसेवा समाजाच्या अंतिम घटकांपर्यंत पोहोचण्याचे काम या शिबिरातून केले जात आहे. कुंदन कांकरिया दांम्पत्यांनी लग्नाचा वाढदिवस या शिबिराद्वारे सामाजिक उपक्रमातून साजरा केला. त्यांचे या आरोग्यसेवेसह विविध सामाजिक कार्यातून दातृत्व दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.


डॉ. सोनल बोरुडे म्हणाल्या की, प्रसुती पूर्वी व नंतर देखील महिलांना विविध खर्चिक चाचण्या कराव्या लागतात. हे सर्वसामान्यांना परवडत नाही. मात्र या सर्व खर्चिक आरोग्यसेवा हॉस्पिटलमध्ये अल्पदरात दिल्या जात आहे. दुर्बिणीद्वारे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, गर्भाशयाची पिशवी काढण्याची शस्त्रक्रिया, सिजेरियन सवलतीच्या दरात तसेच गर्भवती मातांना शिबिरापासून पुढे महिनाभर सोनोग्राफी, रक्त लघवी इत्यादी तपासणीवर 50 टक्के सवलत व बाळंतपणाच्या वेळी बिलात 50 टक्के सवलत दिली जात असून, गरोदर मातांनी या सेवेचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचे आवाहन त्यांनी केले.


डॉ. श्रेयस सुरपुरे म्हणाले की, आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये अद्यावत एनआयसीयू सेंटर कार्यान्वीत असून, अल्पदरात सेवा दिली जात आहे. पुणे सारख्या शहरातून देखील सर्वसामान्य कुटुंबातील बालके उपचारासाठी दाखल करण्यात आली आहे. मोठ्या शहरातील खर्चिक आरोग्य सुविधा परवडत नाही, त्याच दर्जाची आरोग्य सुविधा आपल्या शहरात अल्पदरात उपलब्ध होत आहे. 26 बेडच्या अद्यावत एनआयसीयू विभागात नवजात बाळाच्या श्‍वासोच्छवासाच्या त्रासावर उपचार, बालदमा ए.आर.डी.एस. (श्‍वसनदाह), नवजात बालकांच्या कावीळीसाठी फोटोथेरपी व रक्त बदलण्याची सुविधा, अनुवंशिक आजार, जन्मजात आजारांचे निदान व उपचार, बालदमा तसेच लहान मुलांचे टू डी इको, एक्स रे, पॅथोलॉजी लॅब 24 तास उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली.


डॉ. रुपेश सिकची म्हणाले की, जन्म झालेल्या पासून सर्व बालकांना या हॉस्पिटलमध्ये उत्तम आरोग्य सेवा दिली जात आहे. सर्व प्रकारच्या सुविधा एका छताखाली उपलब्ध असून, दुर्बीणीद्वारे शस्त्रक्रिया देखील उपलब्ध असून, अवघडातली अवघड शस्त्रक्रिया अल्पदरात यशस्वी केली जाते. गरजूंसह सर्वसामान्य व चांगल्या कुटुंबातील व्यक्तींना दर्जेदार आरोग्य सेवा मिळत आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत विविध शस्त्रक्रिया मोफत केल्या जात असून, जे योजनेत बसत नाही त्यांना अल्पदरात सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.


या शिबिरात 70 बालकांची तर 80 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. दर शनिवारी बालकांची ओपीडीमध्ये आरोग्य तपासणी मोफत असून, सोमवार ते शुक्रवार 50 रुपयात तपासणी केली जात आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुन आभार डॉ. आशिष भंडारी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *