धामणे दांम्पत्यांच्या माणुसकीच्या कार्याने भारावले साधक
नगर (प्रतिनिधी)- आरोग्य चळवळ चालविणाऱ्या सावेडी येथील आनंद योग केंद्राच्या साधकांनी माऊली सेवा प्रतिष्ठान संचलित मनगाव प्रकल्पाला भेट देऊन निराधार मनोरुग्णांसाठी 75 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. भान हरवलेले मनोरुग्ण, निराधार महिला व त्यांच्या बालकांसाठी सुरु असलेल्या माऊली सेवा प्रतिष्ठानचे कार्य पाहून सर्व साधक भारावले.
मनगाव प्रकल्पाचे डॉ. राजेंद्र धामणे व डॉ. सुचेता धामणे यांनी मनगाव प्रकल्पाबद्दल उपस्थित साधकांना माहिती दिली. बेवारस मनोरुग्णांसाठी हक्काचे घर बनलेल्या मनगाव प्रकल्पाबद्दल माहिती देताना डॉ. सुचेता धामणे म्हणाल्या की, 28 वर्षांपूर्वी रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्ण महिला पाहून त्यांना डबे आणून देण्यापासून या प्रकल्पाची सुरुवात झाली. या महिलांना राहण्यासाठी घर, आरोग्य सेवा आणि प्रेम दिले पाहिजे या स्वप्नातून मनगाव प्रकल्प उभे राहिले. यामध्ये मनोरुग्ण असलेल्या आणि त्यांच्यावर अत्याचार झालेल्या महिलांचा देखील सांभाळ केला जाऊ लागला. मन हेलावणाऱ्या विविध मनोरुग्णांच्या व्यथा ऐकून उपस्थित महिलांचे डोळे पाणावले. मनगाव मध्ये आज साडेचारशे महिला व चाळीस मुले राहत असल्याचे त्यांनी सांगितले.
आनंद योग केंद्राच्या साधकांनी मनगाव प्रकल्पात राहत असलेल्या आनंद योग केंद्राच्या साधकांनी मनोरुग्ण, निराधार महिला व त्यांच्या बालकांना आपुलकीने जवळ करुन त्यांच्याशी संवाद साधला. येथील सर्व मनोरुग्ण, आजारी महिला स्वावलंबी बनल्या आहेत. दररोज पाचशे महिलांचा स्वयंपाक, साठ गायींच्या गोठ्याची जबाबदारी, ऑर्गेनिक भाजीपाला पिकवणे, शेती करणे, बेकरी प्रॉडक्ट बनविणे, संपूर्ण परीसर स्वच्छ ठेवणे, मुलांची जबाबदारी या प्रत्यक्ष कामाची त्यांनी पहाणी केली. तर त्यांच्या दैनंदिन जीवनक्रम जाणून घेतला. माणुसकीच्या भावनेने सुरु असलेल्या कार्याबद्दल आनंद योग केंद्राच्या साधकांनी मनगाव प्रकल्पाचे कार्य पाहून डॉ. धामणे दांम्पत्यांचे कौतुक करुन या सेवा कार्यात सातत्याने हातभार लावण्याचा संकल्प व्यक्त केला.