रात्र शाळेच्या गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचे लहामगे यांचे आश्वासन
लहामगे यांची टॅक्स प्रॅक्टिशनर्सच्या राज्य संघटनेवर झालेली निवड अभिमानास्पद -डॉ. पारस कोठारी
अहमदनगर (प्रतिनिधी)- हिंद सेवा मंडळाच्या भाई सथ्था नाईट हायस्कूल मधील माजी विद्यार्थी आनंद लहामगे यांची उत्तर महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या जॉइंट सेक्रेटरीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा हायस्कूलच्या वतीने सन्मान करण्यात आला. हिंद सेवा मंडळाचे मार्गदर्शक अजितशेठ बोरा व भाई सथ्था नाईट हायस्कूलचे चेअरमन डॉ. पारस कोठारी यांच्या हस्ते लहामगे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य सुनिल सुसरे, राहुल मिश्रा आदी उपस्थित होते.
डॉ. पारस कोठारी म्हणाले की, बिकट परिस्थितीतून नाईट हायस्कूलमध्ये शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी आपले भवितव्य घडवत आहे. नाईट हायस्कूलच्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात यश संपादन केले असून, हे संस्थेच्या वतीने भूषणावह बाब आहे. लहामगे यांची राज्यस्तरीय संघटनेवर झालेली निवड अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
प्राचार्य सुनिल सुसरे यांनी समाजात नाईट स्कूलचे माजी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात यश प्राप्त केले आहे. विविध उच्च पदावर ते काम करत आहे. तर बिकट परिस्थीतून आल्याची जाणीव ठेऊन प्रत्येक माजी विद्यार्थी सामाजिक कार्यात हातभार लावत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सत्काराला उत्तर देताना आनंद लहामगे म्हणाले की, रात्र शाळा मोठे स्वप्न पाहणाऱ्या युवकांना दिशा देण्याचे काम करत आहे. त्याकाळी शिक्षण घेतले नसते, तर आजची परिस्थिती वेगळी राहिली असती. रात्र शाळेतील शिक्षकांनी मित्र व मार्गदर्शक म्हणून शिक्षणाची गोडी निर्माण केली व त्यातून जीवनात यश प्राप्त करता आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तर रात्र शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन देण्याचे त्यांनी आश्वासन दिले व यापुढे या शाळेसाठी नेहमीच सहकार्य राहणार असल्याची ग्वाही दिली.
