• Fri. Apr 25th, 2025

पारनेर पंचायत समितीत बनावट खरेदी प्रकरण व लाखो रुपयांचा अपहाराची चौकशी व्हावी

ByMirror

Apr 25, 2025

अन्याय निवारण समितीचीचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन


बनावट ईमेल आणि आयडी पासवर्डचा गैरवापर; गुन्हा दाखल न झाल्यास 5 मे रोजी उपोषणाचा इशारा

नगर (प्रतिनिधी)- पारनेर पंचायत समितीतील तत्कालीन तालुका व्यवस्थापक व डाटा एंट्री ऑपरेटर यांनी मिळून बनावट ईमेल आणि आयडी पासवर्डचा गैरवापर करून लाखो रुपयांचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी तत्काळ चौकशी करून 15 दिवसांच्या आत गुन्हा दाखल करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. जर 15 दिवसात चौकशी करून गुन्हा दाखल झाला नाही, तर 5 मे रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी दिला आहे.


तत्कालीन व्यवस्थापकाने ग्रामपंचायत विभागाचा बनावट ईमेल वापरून जीएमई पोर्टलचा आयडी व पासवर्ड मिळवून बनावट खरेदी प्रक्रिया राबवली. या प्रक्रियेद्वारे त्यांनी स्वतःला एचओडी दर्शवून खरेदी केली. खरेदी केलेली स्टेशनरी व इतर वस्तू पंचायत समिती कार्यालयात जमा करण्यात आल्या नसून त्या वस्तू संबंधित व्यक्तीच्या ताब्यात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.


सदर व्यवस्थापकाने इन ॲक्शनफ सॉफ्टवेअर स्वतःच्या मोबाईलशी लिंक करून घेतले होते. या सॉफ्टवेअरचा वापर करून अनेक कामांचे फोटो प्रत्यक्ष काम न दाखवता अपलोड करण्यात आले. त्यामुळे कामे अपूर्ण असूनही ती पूर्ण दाखवली गेली आहेत. विशेष म्हणजे, या फोटोंचे लोकेशन संबंधित कामाच्या ठिकाणी नसून, सदर व्यक्तीच्या राहत्या घराचे असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे स्पष्ट होते.


सदर व्यक्तीने एका महत्त्वाच्या वेबसाईटला स्वतःचा ईमेल आयडी वापरून 15व्या वित्त आयोगाचे पेमेंट सोडण्याचे काम केले. बहुतांश सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी हे तांत्रिक बाबतीत माहिती नसल्याने, त्यांना बनावट ईमेलची कल्पना आली नाही. यामुळे ग्रामपंचायतींची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


या प्रकरणात संबंधित गटविकास अधिकारी, पारनेर यांची भूमिका सुद्धा संशयास्पद असून, त्यांनाही जबाबदार धरण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. समितीने या प्रकरणाची सखोल चौकशी करून तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *