• Tue. Jul 1st, 2025

पार्वतीबाई सुखदेव वेताळ सामाजिक विकास संस्थेचा उपक्रम

ByMirror

Jun 29, 2025

वाडी-वस्तीवर जाऊन मोफत नेत्र तपासणी

नागरिकांच्या जीवनात नवदृष्टी निर्माण करणारे कार्य ईश्‍वरसेवाच -बाळासाहेब टेमकर

नगर (प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील वाडी-वस्तीवर आरोग्य सेवा घेऊन जाणाऱ्या पार्वतीबाई सुखदेव वेताळ सामाजिक विकास संस्थेच्या वतीने पाथर्डी तालुक्यातील भोसे गावात मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर पार पडले. या शिबिरात पंचक्रोशीतील भाविकांचा सहभाग लाभला. या शिबिरात 220 रूग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. तर गरजू 19 रूग्णांवर पुणे येथे मोतिबिंदूची शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे.


या शिबिराचे उद्घाटन सरपंच बाळासाहेब टेमकर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रदिप टेमकर, संस्थेचे अध्यक्ष मेजर शिवाजी वेताळ, सचिव ॲड. स्नेहा वेताळ, देविदास टेमकर, भिवसेन टेमकर, युवराज जोगदंड, अंबादास टेमकर, अशोक टेमकर, रा-हुल टेमकर, बबलू जोगदंड, बाबासाहेब वारे, संभाजी वारे, राहुल वारे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.


सरपंच बाळासाहेब टेमकर म्हणाले की, ग्रामीण भागातील अनेक ज्येष्ठ नागरिकांना वेळेवर आणि योग्य नेत्र उपचार मिळत नाहीत. हे शिबीर अशा लोकांसाठी संजीवनी ठरत आहे. आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या गरजूंना मोफत तपासणी व शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून दिल्याने त्यांना आधार मिळाला आहे. नागरिकांच्या जीवनात नवदृष्टी निर्माण करणारे हे कार्य म्हणजे खऱ्या अर्थाने ईश्‍वरसेवा असल्याचे त्यांनी सांगितले.


संस्थेचे अध्यक्ष मेजर शिवाजी वेताळ म्हणाले की, ग्रामीण भागातील नागरिक, विशेषतः ज्येष्ठ व दुर्बल घटकांतील व्यक्ती आर्थिक अडचणीमुळे वेळेवर नेत्रउपचार घेऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांचे जीवन अंधकारमय बनते. याच अंधारात आशेचा उजेड घेऊन आम्ही गेली 27 वर्षे हे शिबीर राबवित आहोत. आजपर्यंत 244 शिबीरे पार पडली असून हजारो नागरिकांना दृष्टी परत मिळवून देण्यात आम्हाला यश मिळाले आहे. हा सामाजिक उपक्रम म्हणजे केवळ तपासणी नव्हे, तर दृष्टीदोष असलेल्यांना नवदृष्टी देण्याची चळवळ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


या शिबिरात तज्ञ डॉक्टरांनी नेत्रदोष असलेल्या रुग्णांची तपासणी केली. तर डॉ. सौ. कोरडे यांनी आर-आरोग्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर गरजू 19 रूग्णांवर पुणे येथील के.के. आय बुधराणी हॉस्पिटल मध्ये मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *