• Tue. Mar 10th, 2026

मानवसेवेत रंगली सुरमई संगीताची दीप संध्या

ByMirror

Nov 6, 2024

भाऊबीजनिमित्त ज्ञानरचना सोशल फाऊंडेशनचा बेघर मनोरुग्णांसाठी उपक्रम

बेघर, मनोरुग्णांनी लुटला संगीत मैफलचा आनंद

नगर (प्रतिनिधी)- रस्त्यावर फिरणाऱ्या बेघर, मनोरुग्णांसाठी आधार असलेल्या मानवसेवा प्रकल्पात सूरमयी संगीताची दीपसंध्या रंगली होती. गायन आणि वादनाच्या जुगलबंदीचा उपस्थितांनी आनंद लुटला. कल्याण-ठाणे येथील ज्ञानरचना सोशल फाउंडेशनच्या वतीने भाऊबीजनिमित्त बेघर, मनोरुग्णांना मानसिक आधार देण्यासाठी व त्यांची भाऊबीज गोड करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


दीपसंध्या संगीत मैफिलीचे उद्घाटन कवियत्री सरोज आल्हाट व ज्ञानरचना फाउंडेशनच्या संचालिका सारिका शेलार यांच्या हस्ते झाले. फाउंडेशनच्या संचालिका सुप्रिया चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा न्यायाधीश विनोद डोंगरे, जिल्हा ग्राहक मंचाचे न्यायाधीश चारूताई डोंगरे, पोस्टल संघटनेचे कार्याध्यक्ष संतोष यादव, मेहेर ब्लेस्ड संजीवन वेल्फेअर फाउंडेशनचे अध्यक्ष महेश पवार, अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे सचिव दिलीप गुंजाळ, पत्रकार अनिल हिवाळे, महेश कुलकुटके, डॉ. राजेंद्र पवार, आदी उपस्थित होते.


प्रास्ताविकात ज्ञानरचना सोशल फाउंडेशनच्या संचालिका सारिका शेलार यांनी समाजातील मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या आणि वंचित घटकांची दिवाळी व भाऊबीज गोड व्हावी याकरिता ज्ञानरचना सोशल फाउंडेशनने उपक्रम राबविल्याचे स्पष्ट केले.


यमन रागावर आधारीत श्री गणेश वंदनने या दीपसंध्येला प्रारंभ झाले. कलावंत प्रतिष्ठानचे ऋतिक बैरागी, अक्षय गव्हाणे, सौरभ साठे, सोहम लासुरकर, सुवर्ण प्रताप, सागर वाघमारे यांनी एकापेक्षा एक सरस हिंदी-मराठी गीतांचे सादरीकरण केले. या कलावंताबरोबरच न्यायाधीश विनोद डोंगरे यांनी गोड तुझे रुप, गोड तुझे नाव…., तर न्यायाधीश चारूताई डोंगरे यांनी खेळ मांडियेला हे भक्तीगीत सादर केले. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली.
प्रथम तुला वंदितो…, अवघे गरजे पंढरपुर चालला नामाचा गजर…, कानडा राजा पंढरीचा… ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन…, हाल क्या है दिल का ना पूछो सनम…, तेरी दिवाणी…, श्रीराम जानकी बैठे है मेरे सीने मे… आदी हिंदी-मराठी गीतांसह भक्ती गीतांनी सायंकाळ सूरमयी बनली होती.


सुप्रिया चौधरी म्हणाल्या की, ज्ञानरचना सोशल फाउंडेशन मानव सेवा प्रकल्पात मागील दोन वर्षापासून भाऊबीज साजरी करत आहे. या पुढील काळातही मनोरुग्णांच्या आरोग्यासाठी व त्यांना भावनिक आधार देण्यासाठी उपक्रम राबविला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण साळवे यांनी केले. आभार दिलीप गुंजाळ यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *