वन महोत्सव काळात वृक्ष लागवडीसाठी मिळणार मोफत व अल्पदरात रोपं
एक पेड मा के नाम! ही संकल्पना राबविण्यास पुढाकार
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरणाचे प्रश्न सोडविण्यासाठी हरित चळवळ अधिक लोकाभिमुख व जनतेचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वन महोत्सव 2024-25 अंतर्गत अमृतवृक्ष आपल्या दारी ही योजना राबविण्यात येत आहे. 15 जून ते 30 सप्टेंबर हा वन महोत्सव काळ साजरा करुन मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड केली जाणार आहे. अमृतवृक्ष आपल्या दारी योजनेच्या माध्यमातून वृक्ष लागवडीसाठी सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकांमधून मोफत व अल्पदरात रोपं उपलब्ध करुन दिले जाणार असून, याचा लाभ घेण्याचे आवाहन विभागीय वन अधिकारी सचिन कंद व वनक्षेत्रपाल एच.व्ही. उबाळे यांनी केले आहे.
राष्ट्रीय वननीती 1988 नुसार पर्यावरण समतोल राखण्यासाठी एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्के भूभाग वनाच्छादित असणे आवश्यक आहे. तथापि महाराष्ट्र राज्य मध्ये तुलनात्मक दृष्ट्या हे प्रमाण कमी आहे. मोठ्या प्रमाणात शहरीकरण, औद्योगीकरणामुळे वातावरणात बदल होऊन जागतिक तापमानात वाढ होत आहे. या उन्हाळ्यात अनेक जिल्ह्यात 40 अंश सेल्सियसच्या पुढे विक्रमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. या समस्येवर मात करण्यासाठी आणि प्रदेशाचे नैसर्गिक सौंदर्य टिकवण्यासाठी वृक्षरोपण मोहिमेला महत्त्व देण्यात आले आहे. हरितकरणाच्या विविध योजना राबवून राज्याचे हरित अच्छादन वाढविण्यामध्ये आणि देशाच्या वन धोरणाचे उद्दिष्ट पूर्तता करणारा महाराष्ट्र राज्य देशात अग्रेसर ठरला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्याने यापूर्वी 50 कोटी वृक्ष लागवड केली आहे. 15 जून ते 30 सप्टेंबर हा काळ व वन मोहोत्सवाचा काळ म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. या कालावधीत वृक्ष लागवडीसाठी लोकांना उद्युक्त करण्याच्या दृष्टिकोनाने शासनामार्फत सवलतीच्या दराने व मोफत रोपांचा पुरवठा करण्यात येत आहे. याव्यतिरिक्त केंद्र शासनाकडून अलीकडेच एक पेड मा के नाम! ही संकल्पना राबविण्याबाबत सामाजिक वनीकरण प्रयत्नशील आहे. वृक्षरोपण व संवर्धन मोहिमेत सर्वांचा सहभाग मिळण्यासाठी वन महोत्सव काळात अमृत वृक्ष आपल्या दारी योजना राबविण्यात येत असल्याचे विभागीय वन अधिकारी सचिन कंद यांनी म्हंटले आहे.
वन महोत्सव काळात शासकीय, खाजगी मालकीचे पड क्षेत्र, शेत बांधावर, रेल्वे, कालवा आणि रस्त्याच्या दुतर्फा, सामूहिक परिक्षेत्र व गायरान क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. सर्वसामान्य शेतकरी. वृक्षप्रेमी यांना मापक दरात रोपांचा पुरवठा केला जाणार आहे. ज्या शासकीय यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्थांना वृक्ष लागवड करायची आहे. त्यांना जागेच्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यासाठी मोफत रोपांचा पुरवठा केला जाणार आहे. वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनाचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी या चळवळीत हातभार लावण्यासाठी शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात वृक्ष लागवड करू इच्छिणाऱ्या शाळा, विद्यालय व महाविद्यालयांना मागणीप्रमाणे मोफत रोपांचा पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी अमृत वृक्ष मोबाईल ॲप मध्ये देखील माहिती भरुन रोपे उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. शहर व नगर तालुक्यासाठी पिंपळगाव माळवी, आठवड व इसळक या रोपवाटिकेमधून रोपे उपलब्ध होणार आहे. यामध्ये नीम, सिसू, करंज, सिताफळ, आवळा वावळा, जांभूळ, बाहवा, शिवण, वड, पिंपळ इत्यादी रोप उपलब्ध होणार असल्याची माहिती वन क्षेत्रपाल एच.व्ही. उबाळे यांनी दिली.
