• Thu. Feb 5th, 2026

मूकबधिर विद्यालय व वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना एम्प्लिफायरची मदत

ByMirror

Feb 5, 2026

सेवाप्रीतचे मूकबधिर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पाठबळ


मूकबधिर, दिव्यांग विद्यार्थ्यांना समाजाच्या प्रवाहात आणणे ही आपली सामूहिक जबाबदारी -जागृती ओबेरॉय

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समाजातील दुर्बल व दिव्यांग घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या वतीने सावेडी येथील अपंग संजीवनी सोसायटी संचलित मूकबधिर विद्यालय व वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांसाठी उपयुक्त ठरणारे एम्प्लिफायर भेट देण्यात आले. यासोबतच विद्यार्थ्यांना चॉकलेट व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.


हा उपक्रम प्रकल्प प्रमुख रितू वधवा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमास सेवाप्रीत ग्रुपमधील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. यामध्ये सेवाप्रीतच्या अध्यक्षा जागृती ओबेरॉय, ग्रुप लीडर अर्चना खंडेलवाल व गीता नय्यर, तसेच ग्रुपच्या सदस्या भावना सचदेव, गीत किंगर, जया गायकवाड, कविता दरंदले, कुसुम, मनीषा उल्हारे, माया मदान, मायाताई कोल्हे, मीरा बारस्कर, प्रतिभा भिसे, प्रीती धुप्पड, राजश्री पोहेकर, सुनिता आहुजा, श्‍वेता गांधी, सुमन कपूर, सुनीता बक्षी, सुनीता वर्मा, सुरेखा बारस्कर, स्वरण माखिजा, वंदना ठुबे, मिनाक्षी जाधव आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


जागृती ओबेरॉय म्हणाल्या की, अपंग संजीवनी सोसायटीमध्ये मूकबधिर विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांना निवासाचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. समाजातील प्रत्येक घटकातील मुलांना दर्जेदार शिक्षण व आवश्‍यक सुविधा मिळाव्यात, यासाठी सेवाप्रीत सोशल फाउंडेशन सातत्याने योगदान देत आहे. शिक्षण हेच असे प्रभावी साधन आहे, जे या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करू शकते. मूकबधिर विद्यार्थी हेही समाजाचा अविभाज्य घटक असून, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटणारे हास्य पाहिल्यावर आमच्या सर्व प्रयत्नांचे सार्थक झाल्याची भावना निर्माण होते. चांगले विद्यार्थी घडले, तर निश्‍चितच सक्षम भारत घडेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.


प्रकल्प प्रमुख रितू वधवा म्हणाल्या की, सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या वतीने यापूर्वीही दिव्यांग व मूकबधिर विद्यार्थ्यांच्या विविध संस्थांना अनेक प्रकारची मदत करण्यात आली आहे. यावेळी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सादरीकरणे, कार्यक्रम व उपक्रमांसाठी उपयोगी ठरणारे एम्प्लिफायर प्रदान करण्यात आले असून, याचा त्यांना निश्‍चितच लाभ होणार आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सेवाप्रीतने दिलेल्या सातत्यपूर्ण पाठबळाबद्दल अपंग संजीवनी सोसायटीच्या वतीने फाउंडेशनचे आभार व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *