अवघ्या 48 तासांमध्ये 300 किलोमीटर अंतर केले पार
निरोगी आरोग्य व प्रदुषणमुक्तीसाठी दिला संदेश
नगर (प्रतिनिधी)- केडगाव मोहिनीनगर येथील रहिवासी स्वामींभक्त अमित ढोरसकर यांनी नगर ते अक्कलकोट हे सुमारे 300 किलोमीटर अंतर सायकलवरून पूर्ण केले. एक प्रेरणादायी कामगिरी करत त्यांनी सायकलीवर अवघ्या 48 तासांमध्ये हे अंतर कापले आहे.
या प्रवासात त्यांनी केवळ शारीरिक क्षमतेचे नव्हे तर मानसिक ताकतीचे देखील दर्शन घडवले. अक्कलकोट वारीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा प्रवास पूर्ण करत एक सामाजिक आणि आरोग्याचा संदेश दिला आहे. या प्रवासाचे वैशिष्टये म्हणजे केडगाव येथील रेणुका माता मंदिर येथून ही सायकलवारी सुरु करण्यात आली. तर अक्कलकोट येथील स्वामींचे मंदिर येथे थांबली. ढोरसकर यांनी ही सायकलवारी करुन निरोगी आरोग्य व प्रदुषणमुक्तीसाठी सायकल वापरण्याचा संदेश दिला. त्यांनी केलेली सायकलवारी परिसरातील सर्वांसाठी ऊर्जास्त्रोत ठरत आहे. तसेच त्यांचा पुढील प्रवास उज्जेन येथे असणार आहे व नंतर साई पालखी सोहळ्यात पायी दिंडीत ते सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या पुढील वाटचालीस साई सेवा मंडळ व केडगाव ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.