संबंधित उपअभियंता व कनिष्ठ अभियंता यांना निलंबन करण्याची मागणी
रिपब्लिकन युवा सेनेची कार्यकारी अभियंता यांच्याकडे तक्रार
नगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदच्या सार्वजनिक बांधकाम उप विभागातील उपअभियंता व कनिष्ठ अभियंता यांनी कोणतीही प्रशासकीय मंजुरी न घेता, वृत्तपत्रात जाहिरात न देता व निविदा धारकास काम न देता उपविभागाच्या सुशोभीकरणाचे काम सुरु केली असल्याची तक्रार रिपब्लिकन युवा सेनेचे जिल्हा संघटक मेहेर कांबळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे करण्यात आली आहे. पदाचा गैरवापर करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची व त्यांच्याकडे असलेला कार्यभार तात्काळ काढून घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागातील उपअभियंता, कनिष्ठ अभियंता यांनी उपविभागाचे सुशोभीकरणाच्या कामाची कोणतीही प्रशासकीय मंजुरी न घेता, वृत्तपत्रात जाहिरात न देता, कोणत्याही प्रकारची पूर्तता न करता स्वत:च्या अधिकारात सदरचे काम सुरु केलेले आहे. जिल्हा परिषद येथील कोणत्याही विभागातील कोणतेही काम करण्यापूर्वी मंजुरी घेणे आवश्यक आहे. मात्र शासनाचे पैसे लाटण्यासाठी हा अपहार सुरु असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम उप विभागात प्रशासकीय मंजुरी न घेता काम करणाऱ्या सदर अधिकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून बडतर्फ करण्याचे देखील म्हंटले आहे. पंधरा दिवसात कारवाई न झाल्यास जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागा समोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.