चौकशी करण्याची अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी
चौकशी पूर्ण होईपर्यंत ठेकेदाराचे बील अदा करु नये
नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यात शिवपानंद रस्त्याच्या कामासाठी मजूर कागदोपत्री दाखवून सदर कामे जेसीबीद्वारे करण्यात आल्याचा आरोप करुन याप्रकरणी जिल्हा परिषद स्तरावरुन चौकशी करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
याप्रकरणात ठेकेदार, सरपंच, रोजगार सेवक व ग्रामसेवक यांनी संगणमत करुन पैसे लाटण्याचा प्रयत्न चालवला असून, सदर प्रकरणी चौकशी पूर्ण होईपर्यंत ठेकेदाराच्या कामाचे बिल थांबविण्यासाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे व पारनेर तालुकाध्यक्ष निवृत्ती कासुटे यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित विभागाला निवेदन दिले आहे.
पारनेर तालुक्यातील झालेल्या शिवपानंद रस्त्याचे काम ठेकेदार, सरपंच, रोजगार सेवक व ग्रामसेवक यांनी संगणमत फक्त मस्टरवर दाखवलेले आहे. ते काम जेसीबी मशीनद्वारे करण्यात आले असून, संबंधितांनी आपल्या मर्जीतील मजुरांचे नावे यादीत टाकून निम्मे पैसे घेऊन, आपापसामध्ये वाटून घेतल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
सदर कामे सद्यस्थितीत सुरु आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून चौकशी केल्यास मजुरांनी केलेली कामे व मशीनने केलेली काम लक्षात येणार आहे. मजुरांनी खोदलेले खड्डे व मशीनने खोदलेले खड्डे यातला फरक स्पष्ट दिसत आहे. याप्रकरणाची चौकशी पारनेर पंचायत समिती, विस्तार अधिकारी यांच्या मार्फत न करता, जिल्हा परिषद कार्यालय स्तरावरून तात्काळ करुन चौकशी अहवाल तयार करण्यात यावा, जोपर्यंत जिल्हास्तरीय चौकशी अहवाल तयार होत नाही तोपर्यंत पारनेर तालुक्यातील शिवपानंद रस्त्याच्या कामाचे बिल ठेकेदार अदा करण्यात येऊ नये, अशी मागणी संघटनेने लाऊन धरली आहे.
