• Thu. Oct 16th, 2025

बचत गटाच्या नावाखाली महिलांची फसवणुक व शोषण होत असल्याचा आरोप

ByMirror

Aug 14, 2024

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार

बनावट कागदपत्रे सादर करुन कर्ज प्रकरणे मंजूर केल्याप्रकरणी चौकशीची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- बचत गटाच्या नावाखाली बोल्हेगाव येथील आयडीएफसी बँकचे मॅनेजर, अधिकारी, कर्मचारी नागरिकांच्या बनावट कागदपत्राद्वारे कर्जाच्या रकमा देऊन महिलांचे शोषण करत असल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) च्या वतीने करण्यात आला आहे. तर संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांना देण्यात आले. यावेळी शहर कार्याध्यक्ष दानिश शेख, ओबीसी शहराध्यक्ष विजय शिरसाठ, वाहतुक जिल्हाध्यक्ष संदीप वाघचौरे, मुन्ना भाऊअ आदी उपस्थित होते.


बोल्हेगाव येथील आयडीएफसी बँक बचत गटाच्या नावाखाली महिलांना कर्ज मिळवून देतात. पहिले 25 ते 30 हजाराचे कर्ज फेडल्यास पुन्हा 50 हजाराचे वाढीव कर्ज दिले जाते. कर्ज देताना महिलांकडून बँक आधार कार्ड, पॅन कार्ड, लाईट बिल व इतर कागदपत्रे घेतात. परंतु ज्यांच्याकडे कागदपत्रे अपूर्ण असेल, तर बँक कर्मचारी यामध्ये जुगाड करून त्यांना ते कागदपत्र उपलब्ध करून देतात. कोणत्याही महिलेकडे एखादे कागदपत्र कमी असल्यास जास्तीचे पैसे घेऊन सर्व कागदपत्रे बनावट सादर करुन जमा केली जात असल्याचा आरोप रिपाईच्या वतीने करण्यात आला आहे.


एखाद्या महिलेला बचत गटाचा हप्ता भरण्यास उशीर झाला, तर कर्ज वसुलीच्या नावाखाली बँकेचे लोक त्या महिलेच्या घरी दिवस-रात्र येऊन बसतात. कर्ज वसुलीच्या नावाखाली महिलांशी गैरप्रकार केल्याच्या अनेक घटना घडल्या असून, याप्रकरणी अनेक गुन्हे देखील दाखल आहेत. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना कर्ज देऊन त्यांचे एकप्रकारे शोषण सुरु आहे. माझे व माझ्या पत्नीचे आधारकार्डवर दुसऱ्यांचे सह्या घेऊन बँकेतला शिक्का मारून वापरले गेले आहे. ते कागदपत्र गोपनीय स्वरूपात प्राप्त झाले असून, त्यावर खोटे सह्या, बँकेचा शिक्का व माणसाचा फोटो असल्याचे शेख यांनी निवेदनात म्हंटले आहे.


कागदपत्रात अफरातफर करुन बचत गटाचे कर्ज प्रकरणे मंजूर करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, या भ्रष्टाचाराचा उघड होण्यासाठी संबंधित बँकेची चौकशी व्हावी, महिलांचे शोषण थांबविण्यासाठी ज्यांची फसवणुक झाली त्यांचे कर्ज माफ करावे व भरलेले पैसे त्यांना परत मिळण्याची मागणी रिपाईच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा रिपाईच्या वतीने उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *