खोटे गुन्हे मागे घेऊन आरोपींवर कारवाई करण्याची बसपाची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी जीवे मारण्याची धमकी देऊन कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा) येथील मुलावर प्राणघातक हल्ला करुन खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांना अटक करुन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. अन्यथा पिडीत कुटुंबियांसह शुक्रवारी (दि.16 फेब्रुवारी) उपोषण करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी बसपाचे जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ, शहर प्रभारी शहानवाज शेख, मोहन घोलवड, विजय कर्डे, सोमनाथ गोरे, मोहन गायकवाड, विशाल बर्डे, मैफत गायकवाड, रोहित गोरे, गौतम गोरे, हौसराव गोरे, अश्विनी गोरे, संतोष पाटोळे आदी उपस्थित होते.
कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा) येथील गोरे यांनी 13 एप्रिल 2023 रोजी किरण कदम, प्रताप नलगे, शहाजी उर्फ पिल्लू ढवळे, शुभम शिंदे, नाना खोमणे, गोविंद देशमुख, विक्रम ढवळे व संतोष शिंदे यांच्या वरती ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला होता. याचा राग धरुन आरोपींनी वेळोवेळी त्रास देण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यांनी 2 फेब्रुवारी रोजी घरी येऊन दमदाटी व जातीवाचक शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद देण्यात गेले असता, सदर घटनेचे व्हिडिओ शूटिंग दाखवून देखील गुन्हा दाखल न करता पाठवून देण्यात आले.
याप्रकरणी पोलीस अधीक्षकांना भेटून देखील गुन्हा दाखल झाला नाही. यानंतर जिवे मारण्याच्या उद्देशाने सदर आरोपींनी वैभव गोरे यास जबर मारहाण केली. या प्रकरणी मिरजगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करताना पोलिसांनी देखील त्रुटी ठेवून आरोपींची नावे वगळली. याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर सुड घेण्याच्या भावनेने मुलगा शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल असताना देखील एका आरोपीच्या पत्नीने हौसेराव गोरे, भरत गोरे, दीर गौतम गोरे यांच्यावरती पोलीसांनी राजकीय दबावाखाली आर्थिक तडजोड करुन विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप पिडीत कुटुंबीय व बसपाच्या वतीने करण्यात आला आहे.
आरोपींचे राजकीय पक्षातील नेत्यांशी संबंध असल्याने पोलिसांना हाताशी धरुन खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा गुन्हा तात्काळ मागे घ्यावा, मारहाण प्रकरणात आरोपींची वगळलेली नावे समाविष्ट करावी, मुलाच्या खिशातून पैसे काढले याची फिर्याद मध्ये नोंद करावी, आरोपींना तात्काळ अटक करावी, खोटा गुन्हा दाखल करणारे व त्यांना साथ देणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी बहुजन समाज पार्टी व पिडीत कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आली आहे.
