• Fri. Apr 3rd, 2026

तपोवन परिसरात अखंड हरिनाम सप्ताहा भक्तीमय वातावरणात पार

ByMirror

Apr 2, 2026

शबरीची करुणा व भक्ती म्हणजे अहिंसा, समर्पणाची महान परंपरा – ह.भ.प.अभिमन्यू गिरी


चंद्रकांत महाराज खळेकर यांचे काल्याचे किर्तनाने सप्ताहाची सांगता

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- तपोवन परिसरात आयोजित अखंड हरिनाम सप्ताहा भक्तीमय वातावरणात पार पडला. गुरुवारी (दि.2 एप्रिल) सकाळी काल्याच्या किर्तनाने या सोहळ्याची सांगता झाली. या धार्मिक सोहळ्यात परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. महिला भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती.


ह.भ.प. चंद्रकांत महाराज खळेकर यांचे काल्याचे किर्तन झाले. दरम्यान ह.भ.प. अभिमन्यू गिरी महाराज यांनी शबरी हिच्या जीवनातील करुणा आणि भक्ती यांचा अत्यंत हृदयस्पर्शी उहापोह केला. या धार्मिक सोहळ्याने आणि भक्तिमय वातावरणात संपूर्ण परिसर न्हाऊन निघाला.


2022 साली केवळ चार भाविकांच्या उपस्थितीत सुरू झालेला हा सप्ताह आज हजारो भाविकांच्या सहभागाने भव्य स्वरूपात पार पडला. कीर्तन व प्रवचनादरम्यान अभिमन्यू गिरी महाराजांनी शबरी आणि मातंग ऋषी यांच्या आश्रमातील प्रसंग अत्यंत प्रभावी शैलीत मांडला. त्यांनी सांगितले की, शबरी ही करुणामयी व दयाळू स्वभावाची होती. लग्नाच्या वेळी प्राण्यांची हत्या होणार असल्याचे पाहून तिने त्या हिंसेला विरोध केला आणि घर सोडून मातंग ऋषींच्या आश्रमात आश्रय घेतला.


महाराजांनी सांगितले की, शबरी ही लहानपणापासूनच दयाळू आणि करुणामयी स्वभावाची होती. तिच्या लग्नावेळी प्राण्यांची हत्या होणार असल्याचे पाहून तिने त्या हिंसेचा तीव्र विरोध केला आणि त्या प्रसंगातून पलायन केले. तिच्या या कृतीतून “अहिंसा हाच खरा धर्ममार्ग” आहे. हा संदेश मानव जातीला मिळतो.


प्रबोधनकार अभिमन्यू गिरी म्हणाले, शबरीने मातंग ऋषी यांच्या आश्रमात आश्रय घेतला आणि पूर्ण समर्पणाने गुरुसेवा केली. आश्रमातील प्रत्येक कार्य ती निष्ठेने पार पाडत असे. विशेष म्हणजे, आपल्या गुरूंच्या वचनावर विश्‍वास ठेवून तिने आयुष्यभर भगवान रामाच्या आगमनाची प्रतीक्षा केली.


शबरी रोज जंगलातील वाटा स्वच्छ करत असे, कारण तिला खात्री होती की एक दिवस राम त्या मार्गाने येतील. तिच्या या निखळ भक्तीमुळेच रामांनी तिच्या हातचे फळ प्रेमाने स्वीकारले, हा प्रसंग भक्तीचे सर्वोच्च उदाहरण मानला जातो. महाराजांनी आपल्या प्रवचनातून स्पष्ट केले की, शबरीची कथा आपल्याला करुणा, श्रद्धा आणि निस्वार्थ भक्ती यांचे महत्त्व शिकवते. जात, प्रतिष्ठा यापेक्षा अंतःकरणातील शुद्धता आणि प्रेम यालाच खरे स्थान आहे, हा संदेश त्यांनी भाविकांना दिला. हा धार्मिक सोहळा यशस्वी करण्यासाठी जय बजरंग बली ग्रुप व भजनी मंडळाचे मोलाचे योगदान लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *