राष्ट्रवादी युवकच्या वतीने मनपा प्रशासनाचा निषेध
एकही अधिकारी, कर्मचारी महाराजांना पुष्पहार टाकण्यासाठी आला नाही -इंजि. केतन क्षीरसागर
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शिवराज्याभिषेक दिनी महापालिकेत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मनपा प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले. मनपाचे एकही अधिकारी, कर्मचारी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार टाकण्यास आले नसल्याने राष्ट्रवादी युवकच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. तर महापालिकेत संथ गतीने सुरु असलेल्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचे काम तातडीने मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली.
महापालिका प्रशासनाला शिवराज्याभिषेक दिनाचा विसर पडल्याने आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मनपा प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी प्रवक्ते किरण घुले, दिपक वाघ, उपाध्यक्ष मंगेश शिंदे, ऋषीकेश जगताप, कृष्णा शेळके, सरचिटणीस शिवम कराळे, राम थापा आदी उपस्थित होते.

गुरुवारी (दि.6 जून) शिवराज्याभिषेक दिनी दुपारी 1 वाजे पर्यंतही शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले गेले नसल्याचे कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर राष्ट्रवादीचे पप्पू पाटील, विकी तिवारी, नितीन जमधडे, मनोज बारस्कर, आशिष ओहोळ यांनी पुष्पहार आणून महाराजांच्या पुतळ्यास अर्पण केले. आंदोलन होऊनही मनपा प्रशासनाला झालेल्या चुकीची कल्पना देखील आली नसल्याची आंदोलकांनी खेद व्यक्त केला.
महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात आला असून, त्याकडे मनपा प्रशासन पूर्णत: दुर्लक्ष करत आहे. सकाळ पासून एकही अधिकारी, कर्मचारी महाराजांना पुष्पहार टाकण्यासाठी फिरकला नाही. या पुतळ्या भोवती असलेले सुशोभीकरणाचे काम देखील सावकाश सुरु आहे. याचा राष्ट्रवादी युवकच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात येत आहे. -इंजि. केतन क्षीरसागर (शहर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस)
