नोकर भरतीसह इतर प्रश्नांवर चर्चा
माध्यमिक शिक्षण विभाग सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या सूचना
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- कर्मचारींचे विविध प्रश्न सुटून इतर लाभ मिळण्याच्या दृष्टीकोनातून गुरुवारी (दि.24 ऑगस्ट) जिल्हा परिषदेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) राहुल शेळके यांच्या अध्यक्षतेखाली कास्ट्राईब महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी कास्ट्राईबचे राज्याध्यक्ष एन.एम. पवळे, जिल्हाध्यक्ष के.के. जाधव, नाशिक विभागीय अध्यक्ष शिरीष गायकवाड, सहसचिव वसंत थोरात, जिल्हा महिला अध्यक्षा नंदाताई भिंगारदिवे, जिल्हा सचिव नीता देठ, कुंदा क्षेत्रे, तारा ठाणगे, शारदा टोणे, सुरेश देठ, कार्यालयीन सचिव सुदीप पडवळ आदी उपस्थित होते.

या बैठकीत नोकर भरती, पार्किंग व्यवस्था सुरळीत करणे, कर्मचारी व नागरिकांना शुद्ध पाण्याची व्यवस्था करणे, कर्मचारी-अधिकारी यांच्यासाठी निवासस्थान नव्याने उभारावे व जुने दुरुस्त करणे, अडगळीच्या ठिकाणी असलेले महापुरुषांचे पुतळे दर्शनी भागात बसवावे व त्याचे सुशोभीकरण करावे, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र समाज कल्याण विभागामार्फत सुरू करावे, प्रशिक्षणाला वयाची पन्नास वर्षानंतर सूट देवून त्याचा लाभ मिळावा, आश्वासित प्रगती योजनेचा दुसरा, तिसरा लाभ मिळावा, सेवानिवृत्त नजीक असलेल्या प्रशिक्षण पूर्ण केलेल्या आरोग्य सेविकांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळावा, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून जिल्हा परिषद सेवेत 10 टक्के पदे भरण्यासाठी सेवा जेष्ठता यादी अद्यावत करणे व रोस्टर प्रमाणे जागा भरण्याबद्दल चर्चा करण्यात आली.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेळके यांनी सर्व प्रश्न व मुद्दे कर्मचारी हिताचे असल्याचे मत व्यक्त करुन सप्टेंबर पूर्वी सर्व प्रश्नांचा निपटारा करण्याचे आश्वासन दिले. तर भरती प्रक्रिया सुरू असून, 10 टक्के ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून भरती करण्यासाठी यादी तयार करून सप्टेंबर पर्यंत ही भरती प्रक्रिया राबविणार असल्याचे स्पष्ट केले. तर आश्वासित प्रगती योजनेचा लाभ इतर जिल्ह्यांच्या धर्तीवर एस 15 वेतनश्रेणी प्रमाणे देण्याचे मान्य केले.
हातपंप यांत्रिकीची पदे जिल्हा परिषद निर्मित असून, ते भरण्याचा अधिकार मुख्यकार्यकारी अधिकारी यांना आहे. त्यामुळे शंभर पंप मागे एक यांत्रिक भरता येऊ शकणार असल्याची सूचना के.के. जाधव यांनी मांडली. माध्यमिक विभागात कामाचा निपटारा व पारदर्शक कामकाज होण्यासाठी या भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची सूचना एन.एम. पवळे यांनी मांडली. आभार सुहास धीवर यांनी मानले.