धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून वाचन संस्कृती रुजविण्यासाठी सुरु असलेल्या कार्याची दखल
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित अहमदनगर ग्रंथोत्सव कार्यक्रमात ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजविण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांचा सन्मान करण्यात आला.
प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर व सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक (माध्यमिक) श्रीराम थोरात यांच्या हस्ते पै. डोंगरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आकाशवाणीचे प्रसारण अधिकारी सुदाम बटुळे, ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे, लेखक नवनाथ धुमाळ, शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनिल गोसावी, शर्मिला गोसावी, किशोर मरकड, गणेश भगत आदी उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे यांनी धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून निमगाव वाघा (ता. नगर) येथे चार काव्य संमेनल घेवून नवोदीत कवींना प्रोत्साहन देण्याचे कार्य केले. तर विद्यार्थ्यांसाठी निबंध, काव्य लेखन, वक्तृत्व स्पर्धा व चित्रकला स्पर्धा घेवून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम ते करत आहे. ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजविण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध पुस्तकांसह स्पर्धा परीक्षांचे पुस्तके देखील वाचनालयाच्या माध्यमातून ते उपलब्ध करुन देत आहे. त्यांच्या या कार्यादी दखल घेऊन अहमदनगर ग्रंथोत्सवात त्यांचा सत्कार करण्यात आला.