• Wed. Apr 8th, 2026

अहिल्यानगरच्या डॉक्टराचा आंतरराष्ट्रीय सन्मान

ByMirror

Apr 7, 2026

डॉ. अतुल भांबळ यांना अमेरिकेतील कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीकडून डॉक्टरेट


गोव्याचे मुख्यमंत्री कामत यांच्याकडून सन्मान

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील प्रख्यात वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. अतुल भांबळ यांना अमेरिकेतील कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीकडून हॉस्पिटल मॅनेजमेंट या विषयात मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे अहिल्यानगर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.


गोवा येथे पार पडलेल्या पदवीदान समारंभात गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या हस्ते डॉ. भांबळ यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीचे डायरेक्टर अनिल कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


डॉ. अतुल भांबळ हे अहिल्यानगर जिल्ह्यातील वांबोरी गावचे सुपुत्र असून, अत्यंत साध्या शेतकरी कुटुंबातून त्यांनी आपली वाटचाल सुरू केली. प्रचंड मेहनत, चिकाटी आणि सेवाभावी वृत्तीच्या जोरावर त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. हजारो उमेदवारांमधून निवड होऊन मिळवलेला हा सन्मान त्यांच्या गुणवत्तेची आणि कार्यक्षमता सिद्ध करणारा आहे.


विशेष म्हणजे, डॉ. भांबळ हे अर्धांगवायू (पॅरालिसिस)ग्रस्त रुग्णांसाठी मोफत उपचार देण्याचे कार्य सातत्याने करत आहेत. ‘डॉक्टर कीट’ या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील हजारो गरजू रुग्णांना निःस्वार्थ सेवा पुरवली आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे अनेक रुग्णांना नवसंजीवनी मिळाली आहे.


समाजासाठी अहोरात्र झटणाऱ्या आणि वैद्यकीय सेवेचे सामाजिक भान जपणाऱ्या डॉ. अतुल भांबळ यांना मिळालेला हा आंतरराष्ट्रीय सन्मान म्हणजे त्यांच्या कार्याची जागतिक स्तरावर झालेली दखल मानली जात आहे. त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *