शाळा बंद असताना अनुदान लाटणाऱ्यांवर चौकशी अहवालानुसार कारवाईची मागणी
न्यायप्रविष्ट प्रकरणात शाळा बंद असताना अहमदनगरचे सहाय्यक आयुक्तांनी अनुदान मिळण्यासाठी शिफारस केलीच कशी? -रघुनाथ आंबेडकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- शाळा बंद असताना अधिकाऱ्यांना हाताशी धरुन कागदोपत्री शाळा सुरु असल्याचे दाखवून अनुदान लाटणाऱ्या सद्गुरु रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व 2019 नंतरही सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असताना शासनाकडे अनुदानाची शिफारस करणारे अहमदनगर येथील समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यांच्यावर चौकशी अहवालानुसार कारवाई करण्याच्या मागणीसाठी संस्थेतील पिडीत कर्मचारी यांनी पुणे येथील समाज कल्याण आयुक्तालयाच्या कार्यालया समोर उपोषण केले.
या उपोषणात हरेश्वर साळवे, रमेश चक्रनारायण, दिपक गायके, धनंजय वांढेकर, श्रीकांत जाधव, मच्छिंद्र वांढेकर, राजश्री कडवे, कविता आघाव, वृषाली होळकर, प्रमिला गंगेकर, नंदू कोतकर,विजय गाडेकर, धनंजय शिंदे, प्रदीप शिंदे, अमोल वांढेकर, दिपक भवार, श्रीकांत कचरे, स्वप्नील ढगे, प्रसाद सोनवणे आदी सहभागी झाले होते.
या उपोषणास भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेने पाठिंबा जाहीर केला असून, पिडीतांना न्याय न मिळाल्यास राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालया समोर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांनी दिला आहे. तर सन 2019 नंतरही सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असताना व शाळा बंद असताना अहमदनगरचे सहाय्यक आयुक्तांनी सदर संस्थेस अनुदान मिळण्यासाठी शिफारस केलीच कशी? हा प्रश्न उपस्थित केला आहे.

केंद्रीय अधिकारी व सहाय्यक आयुक्त अहमदनगर यांनी संस्थापक अध्यक्ष यांच्याशी अर्थकारण करून कोट्यावधी रुपयांचा अपहार केलेला आहे. या अन्याया विरुद्ध गेल्या 5 वर्षापासून संघर्ष सुरु असून, सदर शाळा बंद आहे. या संस्थेत शिक्षक/कर्मचारी भरतीसाठी संस्थापक अध्यक्ष वृत्तपत्रात फसव्या जाहिराती प्रसिद्ध करत असून, कोणाची फसवणुक होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन हरेश्वर साळवे यांनी केले.
या संस्थेसाठी सन 2013 ते आज अखेर कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. केंद्रीय अधिकारी व भ्रष्ट संचालक मंडळ यांनी सर्व निधी हडप करुन कर्मचारी वर्गाच्या कुटुंबाला देशोधडीला लावले आहे. संस्थेतील कर्मचारीच्या कुटुंबावर आज उपासमारीची वेळ आली असल्याची भावना पिडीत कर्मचारी वर्गाने व्यक्त केली. तर भविष्यात पिडीत शिक्षक, कर्मचारी यांना न्याय न मिळाल्यास संस्थेचे भ्रष्ट संस्थापक अध्यक्ष, संचालक मंडळ व संबंधित अधिकारी यांच्या विरुद्ध (ईडी) प्रवर्तन निर्देशालय यांच्या कार्यालयात दाद मागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या उपोषणात सद्गुरु रोहिदासजी अनुसूचित जाती केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेचे शिक्षक, कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
