नगर (प्रतिनिधी)- 27 व्या ओकिनावा नॅशनल कराटे चॅम्पियनशिप मध्ये संगमनेर येथील कुमारी अद्विता आनंद हासे हिने दैदिप्यमान यश संपादन केले आहे. पुणे येथील श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज स्पोर्टस् कॉम्प्लेक्स बालेवाडी येथे नुकतीच ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेतील काता प्रकारामध्ये तिने रौप्य पदक तर स्पायरींग या क्रिडा प्रकारामध्ये कांस्यपदक पटकाविले.
संगमनेर येथील कराटे अकॅडमीचे संचालक दत्ता भांदुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील शंभरहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. द्वितीय क्रमांकाचे सर्वाधिक पदकं मिळवून या स्पर्धेत टीम संगमनेरने राष्ट्रीय उपविजेतेपद मिळविले. अद्विता हासे ही किसन भाऊ हासे यांची नात असून, तिच्या या यशाबद्दल समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.