राज्यभरातील 16 हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग; लालटाकीच्या महाराष्ट्र बालक मंदिराच्या विद्यार्थ्यांचे नैपुण्य
नगर (प्रतिनिधी)- आधार सोशल ट्रस्ट धायरी (पुणे) आयोजित मायेचा एक घास जवानांसाठी राष्ट्र भक्ती रुजवणाऱ्या या उपक्रमा अंतर्गत राज्यस्तरीय ग्रीटिंग कार्ड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शहरातील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे महाराष्ट्र बालक मंदिर लालटाकी विद्यालयातील चि. अदिराज गणेश भगत (इयत्ता पहिली) या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक प्राप्त करून नेत्रदीपक यश मिळवले आहे.
या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये राज्यभरातील विविध शाळा विद्यालयातून 16 हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ग्रीटिंग कार्ड बनवून सहभाग नोंदवला होता. या ग्रीटिंग कार्ड चे विविध जिल्ह्यांमध्ये प्रदर्शनही आयोजित केली होती व त्यातून क्रमांक काढून विजेत्या स्पर्धकांची नावे घोषित करण्यात आली. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पुणे येथील निळू फुले कला मंदिर सभागृहात मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत ट्रस्टचे अध्यक्ष संतोष चाकणकर यांनी केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सैन्य दलातील कमांडर ऑफिसर हिम्मत सिंग नेगी, बालसाहित्यिक व अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राजीव तांबे, सिने अभिनेते सिद्धेश झाडबुके, स्पर्धाप्रमुख सोपान बंदावणे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी राज्यस्तरीय ग्रीटिंग कार्ड स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न करण्यात आला. या स्पर्धेत महाराष्ट्र बालक मंदिर या विद्यालयातून 360 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यात कु.स्वरा काकडे, रूद्र भंडारी, राघव आडेप या विद्यार्थींनीही नैपुण्य प्राप्त केले आहे.
आदिराज भगत यांनी राज्यात द्वितीय क्रमांकाचे यश मिळवून महाराष्ट्र बालक मंदिर विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. यापूर्वीही आदिराज भगत यांना विविध स्पर्धांमध्ये अनेक पारितोषिकानी सन्मानित करण्यात आले आहे. आदिराज भगत यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे, उपाध्यक्ष डॉ. विवेक भापकर, सचिव ॲड. विश्वासराव आठरे पाटील, सहसचिव जयंतराव वाघ, खजिनदार ॲड. दीपलक्ष्मी म्हसे, विश्वस्त मुकेशदादा मुळे, मुख्याध्यापक अर्चना गिरी, शिक्षक वृंद व आदींनी भगत यांचे अभिनंदन केले आहे. आदिराज भगत हा लेखक, साहित्यिक, गणराज प्रकाशनचे प्रकाशक प्रा. गणेश भगत यांचा चिरंजीव आहे. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.