दोन महिन्यापासून थकलेला कामगारांना वाराई पगार मिळण्याची मागणी
स्वराज्य माथाडी व जनरल कामगार संघटनेचे सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- मागील पाच वर्षापासून एमआयडीसी मधील एक्साइड कंपनीतील माथाडी कामगारांची अर्ज देऊनही नोंदणी होत नाही, दोन महिन्यापासून कामगारांचा वाराई पगार मिळालेला नसून, अवैधरित्या वाराई वसुली व ट्रक ड्रायव्हर कडून पैसे लाटणाऱ्या टोळीप्रमुखावर कारवाई करण्याची मागणी स्वराज्य माथाडी व जनरल कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी संघटनेच्या शिष्टमंडळाने सहाय्यक कामगार आयुक्त नितीन कवले यांची भेट घेवून निवेदन दिले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष योगेश गलांडे, पै. दत्ता तापकिरे, सुनील कदम आदी उपस्थित होते.
अहमदनगर माथाडी असुरक्षित कामगार मंडळाने पाच वर्षे उलटून देखील वेळोवेळी अर्ज, पाठपुरावा, पत्रव्यवहार करूनही एका संघटनेच्या दबावाखाली माथाडी कामगारांची नोंदणी केलेली नाही. नवीन टोळी निर्माण करण्यास विरोध दर्शवीत आहेत. हे कामगारांच्या हिताचे नसून, माथाडी मंडळाची स्थापना कामगारांच्या न्याय हक्क व त्यांच्या फायद्यासाठी झाली आहे. माथाडी कामगारांच्या विरोधात माथाडी मंडळ काम करत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
एक्साईड कंपनीने पुढाकार घेऊनही माथाडी मंडळाच्या नाकर्तेपणामुळे कामगारांची नोंद झालेली नाही. मागील दोन महिन्यापासून टोळीप्रमुखाने अवैधरित्या वाराईची वसुली केली. तर चहा-पाण्याच्या नावाखाली ट्रक ड्रायव्हर कडून वसुली केलेली आहे. या कारणामुळे एक्साइड कंपनीच्या मॅनेजमेंटने टोळी प्रमुख व त्याच्या साथीदाराला बडतर्फ केले आहे. माथाडी मंडळ कडून त्यांच्यावरती अजूनही कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही.
माथाडी मंडळ या लोकांना आपल्या पाठीशी घालत आहे. खंडणी स्वरूपाचा गुन्हा असून, देखील माथाडी मंडळातील काही व्यक्ती त्यांना सामील असून, त्यांना या पध्दतीने गैरकारभार करायला लावत आहे. दोन महिन्यापासून कामगारांना वाराई पगार मिळाला नसल्याने हातावर पोट असलेल्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
माथाडी मंडळातील अध्यक्षांनी यावर तातडीने कारवाई करावी, गेल्या दोन महिन्यांपासून कामगारांना वाराई पगार मिळालेला नाही, तो माथाडी मंडळाने लवकरात लवकर करावा व वाराई देण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
