• Wed. Oct 15th, 2025

शहरात प्रवेश करणाऱ्या अवजड वाहनांवर कारवाई व्हावी

ByMirror

Dec 28, 2024

अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन

अवजड वाहने शहरातील वाहतुक कोंडीला व अपघातांना कारणीभूत

नगर (प्रतिनिधी)- शहरात येणारी अवजड वाहतुक बाह्यवळण मार्गावरून वळवावी व शहरात प्रवेश करणाऱ्या अवजड वाहनांवर कारवाई करण्याची मागणी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. माजी नगरसेवक अनिल शेकटकर यांच्यासह शिष्टमंडळाने खैरे यांच्याशी शहरातील वाहतुक कोंडीच्या प्रश्‍नाबाबत चर्चा केली. याप्रसंगी विशाल कांबळे, मेहेर कांबळे, राहुल शेकटकर, अभय शेकटकर, गणेश पठारे, ओम अडागळे, संदेश शेकटकर, ओमकार राजगुरू, प्रकाश वाघमारे, प्रमोद शिंदे आदी उपस्थित होते.


शहरातील बाह्यवळण रस्त्याचे काम पूर्ण झाले असून, त्या मार्गाने वाहतूक सुरळीत झाली आहे. परंतु काही अवजड वाहने दिवसात शहरातून सर्रासपणे जात आहे. त्यामुळे संभाजीनगर कडून पुणे व सोलापूर कडे जाणारी तसेच बीड कडून जाणारी वाहने उड्डाणपुल उतरल्यानंतर शिल्पा गार्डन ते रेल्वे स्टेशन दरम्यानच्या उड्डाणपूलापर्यंत वाहतूक मोठ्या प्रमाणात ठप्प होत आहे. जवळच असणारे आनंदऋषीजी हॉस्पिटल व इतर हॉस्पिटल असून अनेक वेळा या ठिकाणी रुग्णवाहिका वाहतुक कोंडीत अडकत आहे. पुणे कडून जाणारी वाहतूक नगर शहरातून जात असल्याने शिल्पा गार्डन दरम्यान तसेच रेल्वे उड्डाणपूल उतरल्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतुकीच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतात. यामुळे अनेक लहान-मोठे अपघात घडत असून, या वाहतूक कोंडीचा त्रास नगरकरांना सहन करावा लागत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरामध्ये हॉस्पिटल, महापालिका, जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी शासकीय कार्यालय असून, सदर ठिकाणी कामकाजाकरिता जिल्ह्यातील नागरिकांची वर्दळ असते. यामुळे सदर परिसरात वाहतुक कोंडीचा कायमचा प्रश्‍न उद्भवत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. शहरात येणारी अवजड वाहतुक बाह्यवळण मार्गावरून वळवून शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी शिष्टमंडळाने पोलीस प्रशासनाकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *