अहमदनगर (प्रतिनिधी)- जमिनीच्या वादातून सख्या भावाने व पुतण्याने केलेल्या मारहाणीच्या खटल्यातून न्यायालयाने आरोपीस पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले. गुरुवारी (दि.8 ऑगस्ट) हा निकाल देण्यात आला.
24 एप्रिल 2022 रोजी नगर बायपास रोडचे काम चालू असल्याने त्याचा मुरूम रस्त्यावर पडलेला होता. तो सपाट केलेला असल्याने आरोपी व त्याचा मुलगा हे मुद्दाम मुरूम जमा करुन रस्त्यावर दगड टाकत होते. तेव्हा फिर्यादी व आरोपी यांच्यात शाब्दिक वाद झाले. रस्त्यावर दगड टाकू नका, असे म्हटल्याचा आरोपीस राग आल्याने त्याने व त्याच्या मुलाने फिर्यादीस दगडाने व काठीने मारहाण करून रक्तबंबाळ केले आणि शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. अशा आशयाची फिर्याद नगर तालुका पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली होती.
संपूर्ण प्रकरणाचा तपास करून पोलीसांनी आरोपी विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने एकूण 8 साक्षीदार तपासण्यात आले.सदर साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती व आरोपीच्या वतीने ॲड. कौस्तुभ कुलकर्णी यांनी घेतलेला उलटतपास तसेच मांडलेला बचाव आणि युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरून आरोपी विरूद्ध सबळ पुरावा नसल्याने व सरकारी पक्ष आरोपी विरूद्ध दावा सिध्द करू न शकल्याने न्यायालयाने आरोपीची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपी तर्फे ॲड. कौस्तुभ कुलकर्णी व ॲड. शिवाजी शिंदे यांनी काम पाहिले.