ठेवीदारांची सतर्कता
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील जुने कोर्ट परिसरातील पूर्णवाद नागरी पतसंस्था प्रकरणात ठेवीदारांनीच पुढाकार घेत आरोपींना पकडून कोतवाली पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना नुकतीच घडली. आरोपींना पोलीसांनी न्यायालयात सादर केले असता पुन्हा तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
या प्रकरणात अध्यक्ष सत्यशील अविनाश अकोले (रा. पूर्णवाद नगर, जळगाव), केडगाव शाखा मॅनेजर महेश सुधाकर कुलकर्णी (रा. गोडावूनजवळ, केडगाव) आणि संचालक जितेंद्र कृष्णमूर्ती कुलकर्णी (रा. सहकारनगर, सावेडी) यांना ताब्यात घेण्यात आले होते.
याबाबत अमेय रमेश मुदकवी (रा. बागरोजा हडको, दिल्लीगेट) यांनी 2024 मध्ये कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांनी पतसंस्थेत तब्बल 42 लाख रुपयांची ठेव ठेवली होती. त्यावर 13 टक्के परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र मुदत संपूनही मुद्दल व व्याजाची रक्कम देण्यास पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्याने अखेर ठेवीदारांनी पोलिसांत धाव घेतली.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपींचा शोध ठेवीदार घेत होते. मंगळवारी रात्री ठेवीदारांनीच पुढाकार घेत आरोपींना पकडून कोतवाली पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता प्रथम दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर तपासाच्या दृष्टीने पुन्हा तीन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने मंजूर केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कोतवाली पोलिसांकडून सुरू असून, ठेवीदारांच्या रकमेबाबत आणि पतसंस्थेच्या व्यवहारांबाबत सखोल चौकशी केली जात आहे.
