साक्षीदारांच्या जबाबात विसंगती व पुराव्याअभावी निर्दोष
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महिलेशी विनयभंग (भा.दं.वि. 354) केल्याच्या खटल्यात आरोपीस न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले. बुधवारी (दि. 10 सप्टेंबर) रोजी हा निकाल देण्यात आला आहे.
सदर प्रकरणानुसार, दि.10 डिसेंबर 2014 रोजी फिर्यादी महिला आरोपीच्या घरी मुलीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आली होती. त्यानंतर आरोपीने फिर्यादीला तिच्या मैत्रिणीच्या घरी सोडतो, असे सांगून अरणगाव वाळकी रोडला त्याच्या कारने घेऊन गेला. तर आरोपीने फिर्यादीला गाडीतच ओढणी ओढून, लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन तिचा विनयभंग केला, असा आरोप फिर्यादीने केला होता. या तक्रारीवरून कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता.
तपास पूर्ण करून पोलीसांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात सरकारी पक्षाने पाच साक्षीदार उभे केले. मात्र साक्षीदारांच्या जबाबात गंभीर विसंगती आढळल्या. आरोपीच्या वतीने ॲड. कौस्तुभ कुलकर्णी यांनी प्रभावी उलटतपासणी करून बचाव मांडला. त्यांचे युक्तिवाद व साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती यामुळे न्यायालयाने आरोपीविरुद्धचे सर्व पुरावे अपुरे असल्याचे नमूद केले.
सरकारी पक्ष आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याने न्यायालयाने आरोपीस सर्वच पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले. आरोपीच्या बाजूने ॲड. कौस्तुभ कुलकर्णी यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. गणेश शेटे यांनी सहकार्य केले.