सागरी जलतरण स्पर्धेत पटकाविला 12 वा क्रमांक
नगर (प्रतिनिधी)- शहरातील दिव्यांग जलतरणपटू अभिजीत माने याने मुंबईच्या अरबी समुद्रात झालेल्या सागरी जलतरण स्पर्धेत 1 किलोमीटर पर्यंत पोहण्याचा टप्पा पूर्ण केला आहे. अभिजीत हा विखे पाटील फाउंडेशन स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सागरी जलतरण स्पर्धेत सहभागी झाला होता. त्याने 12 वा येण्याचा बहुमान पटकाविला. दिव्यांग गटातून राज्यभरातून 46 जलतरणपटूंनी सहभाग नोंदवला होता.
अभिजीत माने याने जिल्हा व राज्यस्तरावर जलतरण स्पर्धेत अनेक पारितोषिके पटकाविली आहे. तो पहिल्यांदाच सागरी जलतरण स्पर्धेत उतरला होता. अरबी समुद्रात उडी घेऊन त्याने यशस्वीपणे 1 किलोमीटरचा टप्पा गाठला. ही स्पर्धा मुंबईच्या गेट ऑफ इंडिया येथे पार पडली. या स्पर्धेसाठी त्याला डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व स्पेशल ओलंपिक भारत अहिल्यानगर व स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने संपूर्ण सहकार्य करण्यात आले होते. त्याच्या सरावासह स्पर्धेचा खर्च देखील विखे फऊंडेशनच्या वतीने उचलण्यात आला.
अभिजीतने मिळवलेल्या यशाबद्दल धनश्रीताई विखे अध्यक्षा, स्पेशल ओलंपिकचे (भारत) सरचिटणीस डॉ. दिपक अनाप व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे संचालक डॉ. अभिजीत दिवटे यांनी त्याचे विशेष अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
आईच्या निधनानंतर अभिजीतला अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये जलतरणाचे धडे देण्यात आले आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी धनश्रीताई विखे पाटील यांचे संपूर्णत: सहकार्य लाभले असून, त्या अत्यंत आस्थेने व आपुलकीने सहकार्य करत असल्याची भावनिक प्रतिक्रिया अभिजीतचे वडिल जगन्नाथ माने यांनी दिली.