पंडित महेश खोपडीकर करणार गीतांचे सादरीकरण
नगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथे बुधवार दि. 19 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आठव्या काव्य संमेलनात सुप्रसिद्ध गायक पंडित महेश खोपडीकर यांच्या अभंगवाणी हा गीत गायनाचा कार्यक्रम रंगणार असल्याची माहिती संमेलनाचे संयोजक तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी दिली.
निमगाव वाघा येथील परिवार मंगल कार्यालयात सदर काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. काव्य संमेलनाच्या प्रारंभी सकाळच्या सत्रात धार्मिक व भक्तीगीतांचा समावेश असलेला अभंगवाणी कार्यक्रम होणार आहे. किराणा घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पंडित महेश खोपडीकर हा कार्यक्रमाचे सादरीकरण करणार असून, रसिक श्रोत्यांना या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे यांनी केले आहे.