• Thu. Jul 31st, 2025

अपघातग्रस्त चालकास वैद्यकीय मदत देत दिला आधार

ByMirror

Jul 29, 2025

अहिल्यानगर लक्झरी व स्कूल बस बहुउद्देशीय संस्थेचा सामाजिक उपक्रम

नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर लक्झरी व स्कूल बस बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने शहरात एका अपघातग्रस्त चालकास वैद्यकीय मदत देऊन त्याला आधार देण्यात आले. नांदेड येथील सतीश संग्राम काळे (वय 34) या चालकाचा अपघात झाल्याने त्याच्यावर शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्याच्या गंभीर आर्थिक परिस्थितीमुळे उपचाराचा खर्च पेलवणे कठीण झाले असतानाच, अहिल्यानगर स्कूल बस संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मदतीचा हात पुढे करून माणुसकीचा हात दिला.


सतीश काळे आणि त्याचा सहकारी शंकर विठ्ठल चव्हाण (वय 30) यांचा वाहन अपघात झाल्याने त्यांना गंभीर दुखापती झाल्या. त्यानंतर दोघांनाही शहरातील पॅसिफिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सतीश काळेवर उपचार सुरू असताना हॉस्पिटलचे बिल 76,800 रुपये झाले. मात्र, त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे उपचाराचा खर्च भरता येणे कठीण झाले.


अहिल्यानगर लक्झरी व स्कूल बस बहुउद्देशीय संस्था ही प्रवाशांसह शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी कार्यरत असलेली संस्था असून, या संस्थेतील चालक-मालक केवळ व्यवसायापुरते मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी जपताना दिसत आहेत. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सदर घटनेची माहिती मिळताच तत्काळ पॅसिफिक हॉस्पिटल गाठून हॉस्पिटल प्रशासनासोबत चर्चा केली. रुग्णाच्या कुटुंबाची परिस्थिती पाहून हॉस्पिटलचे डॉ. जाधव यांनी समजूतदारपणा दाखवत संपूर्ण बिल कमी करून केवळ 10,000 रुपयांत सतीश काळेला डिस्चार्ज देण्यास मदत केली.


संस्थेच्या वतीने या वैद्यकीय मदतीसाठी सतीश काळेला मदतीचा आधार देण्यात आला. आजच्या यंत्रयुगात माणुसकी हरवत चाललेली असताना, संस्थेने दाखवलेली ही सामाजिक जाणीव निश्‍चितच अनुकरणीय ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी संस्थेच्या अध्यक्ष शिवाजी उबाळे, उपाध्यक्ष प्रमोद बेदमुथा, उपाध्यक्ष अमोल भांड, सचिव रियाज मुलानी, गणेश गायकवाड, सर्वर कुरेशी, धर्मा वाघस्कर, अमित साळवे, सोमनाथ बळी, जनार्दन, प्रियांका पाटील शेळके उपस्थित होते.

संकटाच्या क्षणी आपण एकमेकांसाठी उभे राहिलो, तर कोणतीही अडचण लहान वाटू शकते. हेच संस्थेने आपल्या कृतीतून दाखवून दिल्याचे संस्थेचे अध्यक्ष शिवाजी उबाळे यांनी सांगितले. तर रुग्णाचे बील कमी केल्याबद्दल पॅसिफिक हॉस्पिटलचे डॉ. जाधव यांचे संस्थेच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *