• Wed. Oct 15th, 2025

लाडकी बहीण योजनेच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री येणार शहरात -सचिन जाधव

ByMirror

Jul 5, 2024

लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी शिवसेनेच्या मदत केंद्राचा बहिणींना आधार

मंगल गेट येथील मदत केंद्रावर महिलांची अर्ज भरण्यासाठी गर्दी

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य शासनाने अर्थसंकल्पात घोषणा केलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्वसामान्य महिलांना मिळण्यासाठी शिवसेनेच्या वतीने मंगलगेट येथे मदत केंद्र कार्यान्वीत करण्यात आले. या मदत केंद्राच्या माध्यमातून महिलांची या योजनेच्या नाव नोंदणीसाठी सुरु असलेली धावपळ थांबणार असून, त्यांच्या अर्जाची ऑनलाईन नोंदणी करण्याची व्यवस्था शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव यांनी करुन दिली आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेच्या वतीने शहरातील विविध भागात व उपनगरातही मदत केंद्र सुरु करण्याची घोषणा करण्यात आली आहे.


लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी मंगलगेटच्या मदत केंद्रावर परिसरातील महिलांची मोठी गर्दी होत असून, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि.4 जुलै) मदत केंद्रावर जाऊन नोंदणी प्रक्रियेची पहाणी केली व महिलांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख सचिन जाधव, उपजिल्हा प्रमुख आनंद शेळके, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अभिषेक भोसले, युवा सेनेचे शहर प्रमुख पै. महेश लोंढे, उपशहर प्रमुख प्रा. विशाल शितोळे, प्रल्हाद जोशी, भिंगार शहर प्रमुख सुनिल लालबोंद्रे, भिंगारचे माजी नगरसेवक संजय छजलाणी, रविंद्र लालबोंद्रे, छगनराव कदम, डॉ. विठ्ठलराव खोबरे आदी उपस्थित होते.


अनिल शिंदे म्हणाले की, सर्वसामान्यांचा विचार करुन राज्यात कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नुकतीच घोषित करण्यात आली असून, महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी पाच ते साडेसात हॉर्स पॉवरच्या विद्युत मोटरी असणाऱ्यांना विज बिल माफ करण्यात आले आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुणांचे तीन गटात वर्गवारी करून महिन्याला दहा, आठ व सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे. महागाईच्या काळात या कल्याणकारी योजना सर्वसामान्यांना दिलासा व आधार देणारे आहे. या कल्याणकारी योजनांच्या प्रचार-प्रसारासाठी शिवसेना विशेष मोहीम राबवून लाभार्थींना लाभ मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.


सचिन जाधव म्हणाले की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांसाठी आनंदाची ठरली आहे. सरकारने रक्षाबंधनाची भेट बहिणींना दिली असून, राज्यातील सर्व महिला खुश आहेत. ही योजना यशस्वीरिता पूर्ण होण्यासाठी शहरात आणि उपनगरात विविध ठिकाणी मदत केंद्राच्या माध्यमातून कॅम्प लावून महिलांची सोय केली जाणार आहे. या योजनेपासून कोणतीही लाभार्थी महिला वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.


लाडकी बहीण योजनेची घोषणा झाल्यापासून त्याचा लाभ मिळण्यासाठी महा-ई-सेवा केंद्र, सेतू कार्यालय, महसूल कार्यालयात महिला, त्यांचे कुटुंबीय व नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. एकाच वेळेस सर्वांची नोंदणीसाठी गर्दी होत असल्याने त्यांचा त्रास कमी होण्यासाठी व योग्य नियोजन करण्याच्या उद्देशाने शिवसेनेच्या माध्यमातून मदत केंद्राची उभारणी करुन त्यांचे अर्ज भरुन देण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. घरचे सांगत होते, नको जाऊ अर्ज भरण्यासाठी त्या पैशाची गरज नाही! आंम्ही तुम्हाला पैसे देतो. मात्र रक्षाबंधनाची ही भावाकडून दिलेली भेट असून, भावाकडून मिळालेल्या हक्काचे पैसे घेणार असल्याची बोलकी प्रतिक्रिया एका लाभार्थी महिलेने व्यक्त केली.



लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना देण्यासाठी मुख्यमंत्री येणार शहरात
लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांच्या खात्यावर दीड हजार महिन्याप्रमाणे जमा होणार आहे. दोन महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यावर एकाचवेळी वर्ग केले जाणार आहे. यासाठी 50 हजार महिलांच्या उपस्थितीत शहरात मेळावा घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रित करण्यात आले असून, त्यांच्या हस्ते एकाचवेळी महिलांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यात येणार आहे. या मेळाव्याच्या दृष्टीने नियोजन सुरु असल्याची माहिती शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *