• Sun. Feb 15th, 2026

राधाकृष्ण मंदिरात गोकुळाष्टमीच्या गोड गजरासह देशभक्तीचीही लहर

ByMirror

Aug 16, 2025

जन्माष्टमी व स्वातंत्र्य दिनानिमित्त वेशभूषा स्पर्धा उत्साहात; विद्यार्थ्यांच्या भजन-किर्तन, श्‍लोकने वातावरण भक्तीमय


बालकृष्ण, यशोदा माता व स्वातंत्र्य सेनानींच्या वेशभूषेत चिमुकल्यांनी वेधले लक्ष

नगर (प्रतिनिधी)- पंजाबी सनातन धर्मसभेच्या राधाकृष्ण मंदिर (ट्रस्ट) सर्जेपुरा येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी व स्वातंत्र्य दिनानिमित्त वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत चिमुकल्यांनी अक्षरशः बालकृष्ण, यशोदा माता तसेच स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्म्यांचे जिवंत रूप साकारून उपस्थितांचे मन जिंकले. या कार्यक्रमातून गोकुळाष्टमीच्या गोड गजरासह देशभक्तीचीही लहर अनुभवायला मिळाली.


श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त विविध कार्यक्रमांनी मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पालक आपल्या मुलांना सुंदर वेशभूषा घालून घेऊन आले होते. छोट्या-छोट्या पावलांनी मंचावर आलेले नटखट कृष्ण व त्यांच्या यशोदा माता या जोडीने कार्यक्रमाची शोभा वाढवली. तर स्वातंत्र्य लढ्यातील शहीद भगतसिंग, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस आदी व्यक्तिमत्वांच्या वेशभूषेत आलेल्या बालगोपाळांनी देशभक्तीची प्रेरणादायी झलक सादर केली. यावेळी 12 ते 15 वर्ष वयोगटातील मुला-मुलींसाठी भजन-किर्तन, श्‍लोक स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत देखील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून उत्तमप्रकारे सादर केलेल्या भजन-किर्तन, श्‍लोकने वातावरण भक्तीमय बनले होते.


कार्यक्रमात केवळ मुलांनीच नव्हे तर त्यांच्या मातांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. कृष्ण-यशोदा जोड्यांनी विविध भक्तिगीतांवर सादरीकरण करत त्या युगातील प्रेम, ममता व भक्तीचे भाव उपस्थितांना अनुभवायला लावले. या वेशभूषा स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जागृती ओबेराय, रुपा पंजाबी, निशा धुप्पड, स्वीटी गुप्ता, मिनू चड्डा यांनी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेचे परीक्षण सुरेखा मन्यार यांनी केले.


श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त राधाकृष्ण मंदिरात ट्रस्टचे अध्यक्ष राकेश गुप्ता व सर्व विश्‍वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरु झाली आहे. मंदिरास आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी बालकृष्णाच्या दर्शनाचा आनंद घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *