लाल सलामच्या घोषणा
पुन्हा सत्ताधाऱ्यांना लाल रंगाची भीती वाटू लागली आहे -कॉ. स्मिताताई पानसरे
नगर (प्रतिनिधी)- भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दी वर्षानिमित्त शहरातील बुरुडगाव रोड येथील पक्ष कार्यालया समोर गुरुवारी (दि.26 डिसेंबर) भाकपचे ध्वज फडकविण्यात आले. ध्वज फडकवून लाल सलामच्या घोषणा देत पक्षाचा जयजयकार करण्यात आला.
भाकपच्या राज्य सचिव मंडळ सदस्या कॉ. स्मिताताई पानसरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हा सेक्रेटरी कॉ.ॲड. बन्सी सातपुते, सह सचिव कॉ. सुधीर टोकेकर, भारती न्यालपेल्ली, फिरोज शेख, सतीश पवार, कन्हैय्या बुंदेले, संगीता कोंडा, सुभाष शिंदे, हेमंत पुरी, अहमद सय्यद आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कॉ. स्मिताताई पानसरे म्हणाले की, शंभर वर्षांत देशातील राजकीय व सामाजिक परिस्थिती पाहता पुन्हा सत्ताधाऱ्यांना लाल रंगाची भीती वाटू लागली आहे. लाल रंग हा संघर्ष, त्यागाचा प्रतीक आहे. कम्युनिस्ट पक्षाचा इतिहास सांगतो की, समाजातील तळागाळातील शेतकरी, उपेक्षित, वंचित घटकांना न्याय देण्याची भूमिका ठेऊन पक्षाने संघर्ष केला आहे. तर यापुढे देखील संघर्ष सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कॉ. बन्सी सातपुते म्हणाले की, भाकप पक्ष शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहे. देशाच्या अखंडता व एकात्मतेसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आजपर्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. देशासाठी पक्षाने सर्वात मोठे बलिदान दिले आहे. स्वातंत्र चळवळीत देखील पक्षाची महत्त्वाची भूमिका राहिली. तर स्वातंत्र्यानंतर देशाच्या जडणघडणीमध्ये सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधित्व करुन शोषणमुक्त समाजनिर्मितीचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कॉ. सुधीर टोकेकर म्हणाले की, संघर्षातून पक्षाची जडणघडण व बांधणी झाली आहे. देशाच्या स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतर देखील भाकप पक्षातील नेत्यांनी देशाला दिशा देण्याचे काम केले. सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी भाकपचा लढा सुरु असून, सर्वसामान्यांना केंद्रबिंदू ठेवून आपल्या विचारधारेशी कधीही तडजोड करण्यात आलेली नसल्याचे त्यांनी सांगितले. शताब्दी वर्षानिमित्त भाकप पक्ष कार्यालय सजविण्यात आले असून, रांगोळी काढून रंगरंगोटी करण्यात आली आहे.
