भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
समता व बंधुत्वतेवर आधारलेल्या समाज निर्मितीसाठी बाबासाहेबांच्या विचाराचा जागर होणे आवश्यक -पै. नाना डोंगरे
नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे नेहरु युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, नवनाथ विद्यालय, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी संविधान उद्देशिकाचे वाचन करण्यात आले. तर विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली.
या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे, बाळासाहेब कोतकर, प्रमोद थिटे, अमोल वाबळे, तेजस केदारी, मंदा साळवे, तृप्ती वाघमारे, मयुरी जाधव, भानुदास लंगोटे, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, प्रतिभा डोंगरे-खोडदे, राम जाधव, लहानबा जाधव, प्रियंका डोंगरे-ठाणगे आदींसह शालेय शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पै. नाना डोंगरे म्हणाले की, हजारो वर्षापासून विषमता आणि अंधारात असलेल्या वंचित समाजाला बाबासाहेबांनी जागृक करुन त्यांचा उध्दार केला. बाबासाहेबांनी धम्मक्रांतीतून खरा माणुसकी धर्म शिकवला. धर्मातील भेदभाव, उच्चनिचता संपवून त्यांनी दीन-दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळवून दिला. समता व बंधुत्वतेवर आधारलेल्या समाज निर्मितीसाठी बाबासाहेबांच्या विचाराचा जागर होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
मंदा साळवे म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानामुळे जगाला प्रगल्भ लोकशाहीची प्रचिती आली आहे. राजेशाही संपवून सर्वसामान्य मतदारांच्या हातात देशाची सूत्रे आली. संविधानाने देशात समता, बंधुता व स्वातंत्रता प्रस्थापित झाली असल्याचे सांगून, त्यांनी बाबासाहेबांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर भाषणे केली.
