ज्ञानेश्वर माऊलींच्या जलाशये निर्मावी! महावने लावावी, नानाविधे! या ओवीचा प्रचार-प्रसाराचा आग्रह
पीपल्स हेल्पलाइनचे शिष्टमंडळ संमेलनाचे अध्यक्ष शरद पवार व केंद्रीय मंत्री गडकरी यांची घेणार भेट
नगर (प्रतिनिधी)- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन फेब्रुवारी मध्ये नवी दिल्ली येथे होत आहे. या संमेलनाच्या माध्यमातून ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरी मधील जलाशये निर्मावी! महावने लावावी, नानाविधे! या ओवीतून ग्लोबल वार्मिंगचा प्रश्न आणि सर्वत्र असणारी पाण्याची टंचाई कायमची संपवण्यासाठी संमेलनाचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि सध्याचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची मदत घेण्याचा निर्णय पीपल्स हेल्पलाइनने घेतला असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.
ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेल्या ज्ञानेश्वरीतून जीवनातील प्रश्नांचा उलगडा होतो. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची शासन पद्धती सर्व जगाला आदर्श अशी आहे. त्यामुळे दिल्ली येथे होणारे मराठी साहित्य संमेलन ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांची ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न सोडविणारी ओवी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या श्रेष्ठत्व सर्व जगाला दाखवण्याची ही एक नवी संधी असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
रेन गेन बॅटरीच्या माध्यमातून देशभरातील सर्व जिरायत शेती ही हंगामी बागायत करता येऊ शकेल. त्याचबरोबर निसर्ग धनराईच्या माध्यमातून देशातील सर्व शेतकऱ्यांना दुष्काळ, दारिद्य्र आणि आत्महत्येच्या खाईतून बाहेर काढण्याची संधी ज्ञानेश्वर माऊलींनी जलाशये निर्मावी! महावने लावावी, नानाविधे! दिलेला एक क्रांतिकारी मंत्र संपूर्ण देशाला उपलब्ध असल्याचे या संमेलनातून स्पष्ट करता येणार आहे. विशेष म्हणजे राष्ट्रपती भवनच्या आवारात रेन गेन बॅटरी बसवावी आणि निसर्ग धनराई निर्माण करावी याचा आग्रह देखील संघटनेने धरला आहे.
1972 नंतर 52 वर्षात देशातील लक्षावधी शेतकरी दुष्काळाने होरपळले आहेत. परंतु रेन गेन बॅटरीमुळे आणि निसर्ग धनराईमुळे शेतकऱ्यांना दुष्काळातून कायमचे मुक्त करता येईल, कारण प्रत्येक जमिनीच्या तुकड्यावर पडणाऱ्या पावसाचे पाणी रेन गेन बॅटरीच्या माध्यमातून जमिनीच्या खाली वर्षभर टिकणारी ओल निर्माण करण्यासाठी वापरता येणार आहे. त्यातून निसर्गराई उभी करता येणार आहे. यापूर्वी 40 टक्के पावसाचे पाणी वाहून जायचे आणि जमिनीवर पसरलेल्या 40 टक्के पाणी बाष्पीभवनातून उडून जायचे. तर फक्त 20 टक्के पाणी जमिनीमध्ये मुरल्यामुळे शेती व्यवसाय गेल्या 52 वर्षात घाट्यात आला आहे. रेन गेन बॅटरीमुळे 70 टक्के पेक्षा जास्त पावसाचे पाणी जमिनीच्या खाली वर्षभर टिकणारी ओल निर्माण करण्यासाठी नक्कीच वापरले जाऊ शकणार आहे. त्यातून सर्वत्र निसर्ग धनराई उभी करता येऊ शकणार असल्याची भूमिका संघटनेच्या वतीने मांडण्यात आली आहे.
अनुशक्तीतून तयार झालेला बॉम्ब हिरोशिमा व नागासाकी उध्वस्त करण्यासाठी वापरला गेला. परंतु ज्ञानेश्वर माऊलींची एक ओवी जगातील ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न आणि पाणीटंचाईचा प्रश्न कायमचा संपवू शकते. यातून महाराष्ट्रातील ज्ञानेश्वर माऊलींच्या ओवीचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श कार्य जगातील घराघरात नेता येणार आहे. यामुळे मराठी साहित्य संमेलनाचा वापर ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि विशेषत: राजधानी दिल्लीवरील धुक्याचे राज्य संपवण्यासाठी उपयोगाला येऊ शकणार असल्याचे ॲड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे.
लवकरच संघटनेचे कार्यकर्ते माजी केंद्रीय मंत्री शरद पवार व केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन आग्रह करणार आहे. परिवहन मंत्री गडकरी देशभरातील राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला रेन गेन बॅटरीचा वापर नक्की करतील व राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा हरीत निसर्गराई नक्कीच निर्माण होऊ शकेल! अशी अपेक्षा संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.