शिक्षक व साहित्यिकांचा पुरस्काराने होणार गौरव
प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने निमगाव वाघा (ता. नगर) येथे शिक्षक दिनानिमित्त सहावे राज्यस्तरीय काव्य संमेलन रंगणार आहे. 5 सप्टेंबरला होणाऱ्या या काव्य संमेलनात शिक्षण व साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार असल्याची माहिती डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी दिली.

काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी गीताराम नरवडे यांची निवड करण्यात आली आहे. नरवडे यांची होरपळ कादंबरीचे दोन आवृत्त्या प्रकाशित झाल्या असून, त्यांचे अनेक काव्य व कथासंग्रह प्रकाशित झाल्या आहेत. या काव्य संमेलनात शिक्षक व गुरुजनांवर कवितांचे सादरीकरण होणार आहे. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करुन विद्यार्थी घडविणाऱ्या शिक्षकांना क्रांतीज्योती सावित्री-फातेमा शिक्षिका पुरस्कार, क्रांतीसुर्य महात्मा फुले शिक्षक पुरस्कार तर साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न पुरस्कार, छत्रपती संभाजी महाराज साहित्यरत्न पुरस्कार, केशवसूत साहित्यरत्न पुरस्कार व संत तुकडोजी महाराज साहित्यरत्न पुरस्काराने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे. शिक्षक दिनानिमित्त काव्य संमेलनासह विविध उपक्रमाचे आयोजन देखील करण्यात येणार आहे.
पुरस्काराचे प्रस्ताव 20 ऑगस्ट पर्यंत पै. नाना डोंगरे, अध्यक्ष (संस्थेचे कार्यालय) स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, निमगाव वाघा ता. जि. अहमदनगर 414005 या पत्त्यावर पाठवावे व अधिक माहितीसाठी 9226735346, 8605775261 या नंबरवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे. निवड समिती आलेल्या प्रस्तावामधून पुरस्कार्थींची निवड करणार आहे.
काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नरवडे यांची निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे, गझलकार रज्जाक शेख, कवी आनंदा साळवे, मा. प्रा. शंकरराव चव्हाण, कवी सुभाष सोनवणे, अनिता काळे, बाळासाहेब शहाणे यांनी अभिनंदन केले आहे.
काव्य संमेलन यशस्वी होण्यासाठी युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे-खोडदे, सचिन जाधव, गौतम फलके, अक्षय ठाणगे, ऋषीकेश बोडखे, छाया वाबळे, कांता वाबळे, किरण ठाणगे, देविदास आंबेकर, प्रियंका डोंगरे-ठाणगे परिश्रम घेत आहे.