• Sat. Mar 15th, 2025

शहरात रंगली महिलांची महाराष्ट्रीयन पारंपारिक वेशभूषा स्पर्धा

ByMirror

Jul 31, 2024

यशवंती मराठा महिला मंडळाचा उपक्रम

नऊवारीत साज-शृंगाराने मराठमोळ्या वेशभूषेत महिलांचा सहभाग; महिला शिक्षिकांचा सन्मान

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- यशवंती मराठा महिला मंडळाच्या वतीने महिलांसाठी घेण्यात आलेल्या महाराष्ट्रीयन पारंपारिक वेशभूषा स्पर्धा उत्साहात पार पडली. नऊवारीत साज-शृंगार करुन मराठमोळ्या वेशभूषा परिधान करुन महिला मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. तर गुरुपौर्णिमेच्या पार्श्‍वभूमीवर महिला शिक्षिकांचा सन्मान करण्यात आला.


आपल्या महाराष्ट्रातील संस्कृतीचा जोपासना करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी राजमाता जिजाऊंचे पूजन करून व जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविकात जिल्हाध्यक्षा गीतांजली काळे यांनी यशवंती मराठा महिला मंडळाच्या वतीने वर्षभर राबविण्यात येत असलेल्या सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमाची माहिती दिली.


ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा मायाताई कोल्हे म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या मातीत व जिजाऊ साहेबांच्या स्वराज्यात जन्म घेतल्याचा प्रत्येकाला अभिमान असावा. महिलाच संस्कृतीची जोपासना करुन समाजात संस्कार रुजवत असतात. यासाठी महिलांना आपल्या संस्कृतीची जाणीव असली पाहिजे. आपली संस्कृती व विचारधारा घराघरात पोहोचविण्याचे त्यांनी आवाहन केले. पाहुण्यांचा परिचय जिल्हा उपाध्यक्षा कविता दरंदले यांनी करून दिला. यावेळी मेघाताई झावरे, शीलाताई शिंदे, शोभा भालसिंग, आशाताई शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.


यावेळी नऊवारी, सुंदर माझी नथ, अंबाडा केशभूषा, मॅचिंग स्पर्धा पार पडली. यामध्ये उत्कृष्ट नऊवारीत वर्षा लगड यांनी प्रथम व कविता दरंदले यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. पारंपारिक नथ स्पर्धेत मीनाक्षी जाधव, अंबाडा केशभूषा मध्ये प्रतिभा भिसे प्रथम आल्या. मॅचिंगमध्ये शोभा भालसिंग विजयी ठरल्या. सरप्राईज गेम मध्ये मंगल काळे, गीतांजली काळे, सारिका गाडे, मंगल शिर्के, सारिका खांदवे, यांनी बक्षीसे पटकाविली. ग्रुपच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विजेत्या महिलांना बक्षीसे देण्यात आली. स्पर्धेचे परीक्षण वंदना गोसावी यांनी केले.


गुरुपौर्णिमेच्या पार्श्‍वभूमीवर शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या शिक्षिका शोभा भालसिंग, रूपाली ताकटे, सारिका गाडे, सुलक्षणा अडोळे, मीरा बारस्कर, राजश्री शेळके, मीनाक्षी जाधव, अनामिका म्हस्के, रोहिणी पुरनाळे, आरती थोरात, ज्योती पवार, अर्चना बोरुडे यांचा सन्मान करण्यात आला. कु. तनया कदम हिचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहराध्यक्ष मीरा बारस्कर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भापकर ताई, मीरा बेरड, कल्याणी शेळके, ज्योति गंधाडे, मंगल शिर्के, शर्मिला कदम यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *