अहिल्यानगर-पुणे इंटरसिटी रेल्वे सुरु करण्याची मागणी
लवकरच अहिल्यानगर-पुणे ट्रायल बेसवर इंटरसिटी रेल्वे सुरु करण्याचे रेल्वेचे महाप्रबंधकांचे आश्वासन
नगर (प्रतिनिधी)- शहराच्या दृष्टीने अनेक वर्षापासून प्रलंबीत असलेला व अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेल्या अहिल्यानगर-पुणे इंटरसिटी रेल्वे सुरु होण्यासाठी अहिल्यानगर-पुणे इंटरसिटी रेल्वे समितीच्या शिष्टमंडळाने सेंट्रल रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मीना यांची भेट घेऊन निवेदन दिले. मागील 14 वर्षांपासून 40 हजार पेक्षा जास्त नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन रेल्वे विभागाकडे पाठपुरावा सुरु असल्याचे स्पष्ट करण्यात आले. खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीमध्ये नगरच्या रेल्वे स्थानकावर आलेले रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मीना यांच्याशी सदर प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यात आली. लवकरच अहिल्यानगर-पुणे ट्रायल बेसवर इंटरसिटी रेल्वे सुरु करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
याप्रसंगी अहिल्यानगर-पुणे इंटरसिटी रेल्वे समितीचे हरजीतसिंग वधवा, प्रशांत मुनोत, संजय सपकाळ, अर्शद शेख, अजय दिघे, अशोक सब्बन, संदेश रपारिया, अनिल सबलोक आदी उपस्थित होते. तसेच इंजिन बिलंब वाचवण्यासाठी दौंड येथे कॉर्ड लाईनचे काम पूर्ण केल्याबद्दल आणि नगरच्या रेल्वे स्थानकावरील नवीन प्लॅटफॉर्मसाठी रेल्वे विभागाचे आभार मानण्यात आले.
सध्या दौंडमध्ये कॉर्ड लाईन, विद्युतिकरण आणि रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण झाले आहे. शटल ट्रेनसाठी इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे. इतकेच नव्हे तर लहान तालुका असलेल्या दौंडमधून पुण्यासाठी एक दैनंदिन शटल ट्रेन आहे. नगर हा एक प्रमुख स्थान असून भारतातील एक मोठे आर्मी बेस आहे. आजच्या नागरी गरजांसाठी अहिल्यानगर-पुणे इंटरसिटी रेल्वे ही काळाची गरज बनली असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
अहिल्यानगर व पुणे दरम्यान दररोज 20 हजार हून अधिक प्रवासी प्रवास करतात, तर आठवड्याच्या शेवटी ही संख्या 40 हजार पर्यंत पोहोचते. अहिल्यानगरहून पुण्यापर्यंत रस्त्याने 3 तास लागतात, तर शहरात प्रवेश करण्यासाठी अतिरिक्त 1.5 तासांचा वेळ लागतो. अहिल्यानगरहून पुण्यापर्यंत एस्टी स्टँडवरून 800 बस चालतात. यामध्ये ट्रॅव्हल बस समाविष्ट नाहीत, आणि त्या नेहमीच भरलेल्या असतात. रस्त्यावर अवजड वाहनांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सध्याच्या फोर लेन रस्त्याची क्षमता कमी पडत आहे, त्यामुळे ट्रॅफिक जाम आणि इंधनाची अपव्यय होते. अहिल्यानगर-पुणे दैनंदिन इंटरसिटी ट्रेनमुळे इंधन बचत, प्रदूषण आणि अपघात कमी होतील. दररोज 20,000 पेक्षा अधिक प्रवासी या सोयीचा लाभ घेऊ शकतील. नागरिकांसह सेना दल, रेल्वे पोलिस यांनाही याचा फायदा होईल. रेल्वे उत्पन्नात वाढ होईल, दरवर्षी सुमारे 5 कोटी रुपये मिळू शकणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
अहिल्यानगर येथून सकाळी 6:00 वाजता शटल ट्रेन आणि पुण्याहून सायंकाळी 6:30 वाजता अहिल्यानगरकडे इंटरसिटी ट्रेन चालवावी, पर्यायी सर्व पैसेंजर गाड्या बंद असल्याने पुणे-निजामाबाद आणि दौंड-नांदेड या दोन डेमू रेल्वेला प्रत्येक स्थानकावर थांबा देण्याची मागणी अहिल्यानगर-पुणे इंटरसिटी रेल्वे समितीच्या वतीने करण्यात आली आहे.