पिडीत महिलेची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव; सोशल मीडियाद्वारे मैत्री करुन महिलेवर केले वारंवार अत्याचार
बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुन्हा दाखल करत नसल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- फेसबुक व व्हॉट्सअपद्वारे मैत्री झालेल्या व्यक्तीने लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जावून अत्याचार केलेले असताना लग्नाची विचारणा केल्यास जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सांगवी (ता. पारनेर) येथील त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी रायगव्हाण (ता. श्रीगोंदा) येथील आदिवासी भिल्ल समाजाच्या महिला व तिच्या आईने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. याप्रकरणी बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुन्हा दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करत असून, उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा आरोप पिडीत महिलेने केला आहे. तर सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल होण्यासाठी 10 ऑक्टोंबर पासून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
आदिवासी भिल्ल समाजातील महिला रायगव्हाण (ता. श्रीगोंदा) येथे आपल्या आई समवेत मजुरी करुन राहत आहे. त्याची फेसबुक व व्हॉट्सअपद्वारे सांगवी (ता. पारनेर) येथील एका पुरुषाबरोबर मैत्री झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये संबंध प्रस्थापित झाले. सदर पुरुषाने महिलेच्या घरी येऊन लग्नाची विचारणा केली. त्याला पहिले लग्न झाल्याची विचारणा केल्यास त्याने माझी पत्नी माझ्यासमवेत राहत नाही, तिने दुसरे लग्न केल्याचे सांगितले. आपण दोघे एकत्र राहू तुझ्या नावाने दोन एकर जमीन करून देतो असे सांगून त्या व्यक्तीने महिलेशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
शिरूर येथे यशवंत कॉलनी येथे भाड्याच्या खोलीमध्ये ठेवले. त्यानंतर पैश्याची अडचण सांगून जवळा (ता. पारनेर) येथे भाड्याने खोली घेऊन ठेवले. सदर ठिकाणी त्या व्यक्तीने वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. काही दिवसांनी घराबाहेर हाकलून देत पुन्हा परत आल्यास जीवे मारण्याची धमकी त्या व्यक्तीने दिली. त्या व्यक्तीशी पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यास त्याने रायगव्हाण (ता. श्रीगोंदा) येथे राहत्या घरी येऊन शिवीगाळ करुन पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार अर्जात पिडीत महिलेने म्हंटले आहे.
या प्रकरणी गुन्हा दाखल होण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याने पिडीत महिलेने यापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली होती. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सदर महिलेची तक्रार घेण्याचे पोलीस निरीक्षकांना सांगितले. गुन्हा दाखल करण्यास गेल्यानंतर पुन्हा बेलवंडी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली असल्याचे महिलेचे म्हणने आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन न्याय मिळण्याची मागणी पिडीत महिलेने केली आहे.