• Fri. Mar 14th, 2025

एक तास राष्ट्रवादीसाठीच्या बैठकीत पवार यांच्या निर्णयाचा अभिनंदनाचा ठराव

ByMirror

May 7, 2023

शहराच्या विकासात्मक परिस्थितीवर चर्चा

महाराष्ट्राच्या जडणघडणीत व देशाच्या विकासासाठी शरद पवार यांचे मोठे योगदान -प्रकाश भागानगरे

अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या जडणघडणीत व देशाच्या विकासासाठी शरद पवार यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या विचार व कार्याने पुरोगामी महाराष्ट्राला विकासाची दिशा मिळाली. त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय मागे घेतल्याने पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांना एकप्रकारे ऊर्जा मिळाली आहे. या निर्णयाचे पक्षासह सर्वसामान्य नागरिकांनी देखील स्वागत केले असल्याचे प्रतिपादन नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी केले.


एक तास राष्ट्रवादीसाठी, आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी या उपक्रमांतर्गत महात्मा फुले चौकातील संपर्क कार्यालयात नागरिक, पक्षाचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यात झालेल्या संवाद बैठकीत नगरसेवक भागानगरे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, सरचिटणीस लकीशेठ खूपचंदानी, उद्योग व व्यापार सेलचे अनंत गारदे, विष्णू कलागते, धर्मा करांडे, बाबा भगत, छबुराव कांडेकर, बापूसाहेब ओव्हळ, नारायण इवळे, राजेंद्र खताळ, अरुणराव रासकर, बापूसाहेब सुंबे, किरण भागानगरे, शिवतेज भागानगरे, गणेश मगर, समीर खडके, संतोष त्रिंबके, सागर गुंजाळ, जॉय लोखंडे, राजेंद्र जगताप, राहुल शेळके, अक्षय चेमटे, अमोल नांगरे, गणेश भदर, प्रदीप बरबडे, म्हस्के सर आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.


प्रास्ताविकात प्रा. माणिक विधाते म्हणाले की, प्रत्येक कार्यकर्त्यांना दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडल्यास पक्षाला बळ मिळणार आहे. सर्वांनी मनापासून कार्य करण्याची गरज असून, राष्ट्रवादी देशाच्या राजकारणातील आघाडीचा पक्ष म्हणून उदयास येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय मागे घेतल्याचा आमदार संग्राम जगताप व आमदार अरुणकाका जगताप यांच्या वतीने अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. तर यावेळी आमदार संग्राम जगताप विकासात्मक दृष्टीकोनाने शहरात झालेल्या विकास कामांची व सुरु असलेल्या कार्याची माहिती देण्यात आली.


समीर फडके म्हणाले की, शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयाने पक्षासह राजकारणात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यकर्त्यांच्या भावना अनावर झाल्या होत्या. कार्यकर्त्यांच्या दबाव व प्रेमापोटी त्यांना निर्णय मागे घ्यावा लागला. त्यांनी राजकारणात मिळवलेले हे यश असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *