कोरोनाच्या लढाईमध्ये फिजिओथेरपी उपचाराची अनेक रुग्णांना मदत -वसंतराव कापरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक अंतर्गत डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचलित कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ उत्साहात पार पडला. विळदघाट येथील विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या सभागृहात विश्वस्त वसंतराव कापरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.
प्रारंभी कॉनव्होकेशन मार्च व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी संस्थेचे संचालक डॉ. अभिजीत दिवटे, डॉ.पी.एम. गायकवाड, फिजिओथेरपी कॉलेजचे प्राचार्य डॉ. श्याम गणवीर, उपप्राचार्या डॉ. सुवर्णा गणवीर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश मोरे, प्रा.डॉ. दीपक अनाप, प्रा.डॉ. सोन्याबापु शेवाळे, प्रा.डॉ. साकिब सय्यद, प्रा.डॉ. माहेश्वरी हरिश्चंद्र प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
वसंतराव कापरे म्हणाले की, कोरोनाच्या लढाईमध्ये फिजिओथेरपी उपचाराची अनेक रुग्णांना मदत झाली. यामुळे अनेकांना नवजीवन मिळाले. कुठलेही दुष्परिणाम नसणारी ही वैद्यकीय शाखा आहे. या शाखेची पदवी भेटल्यानंतर जीवनाचा खरा खडतर प्रवास सुरु होतो. त्यात यशस्वी होण्यासाठी निरंतर शिकत राहण्याची भूक असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. श्याम गणवीर यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी राबवलेल्या उपक्रमाची माहिती देऊन विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पाहुण्यांच्या हस्ते फिजिओथेरपी कॉलेजच्या स्टेप्स या मासिकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी डॉ. अभिजित दिवटे यांनी फिजीओथेरपीमध्ये देशात व परदेशात असलेल्या संधीची माहिती दिली. विद्यार्थ्यांना पदवीचे वितरण करून शपथ देण्यात आली. तर शैक्षणिक वर्षातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी, एनएसएस स्वयंसेवक आदी पारितोषिक वितरण करण्यात आले. याप्रसंगी संस्थेतील सर्व युनिटचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. प्रा.डॉ. सोन्याबापु शेवाळे यांनी आभार मानले.