जिल्हा पदाधिकार्यांकडून सत्कार
वारकरी संप्रदायात कार्यरत राहून माणुसकीच्या भावनेने दीन-दुबळ्यांना आधार देण्याचा प्रयत्न कौतुकास्पद -विजय भालसिंग
अहमदनगर (प्रतिनिधी)- समाज प्रबोधनाचे कार्य करणार्या महिला कीर्तनकार ह.भ.प. हिराबाई मोकाटे यांची जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या दक्षिण महाराष्ट्र महिला अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या निवडीबद्दल मोकाटे यांचा जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे जिल्हा कार्याध्यक्ष विजय भालसिंग व शहराध्यक्ष किर्तनकार ह.भ.प. दिलीप महाराज साळवे यांनी सत्कार केला.
ह.भ.प. हिराबाई मोकाटे या महिला कीर्तनकार असून, धार्मिक व सामाजिक कार्यासह समाज प्रबोधनाचे कार्य करत आहे. ते सातत्याने हुंडा बंदी, पर्यावरण, स्त्रीभ्रूणहत्या, महिला सक्षमीकरण आदी विषयांवर प्रवचन व किर्तनातून सामाजिक संदेश देत असतात. मोकाटे यांच्याकडे महिला जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी होती, त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना राज्य कमिटीवर काम करण्याची संधी राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर यांनी दिली आहे.
विजय भालसिंग म्हणाले की, जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या माध्यमातून अनेक वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न सुरु आहे. वारकरी संप्रदायात कार्यरत राहून माणुसकीच्या भावनेने दीन-दुबळ्यांची सेवा करुन गरजूंना आधार देण्याचे कार्य कौतुकास्पद आहे. तर समाजाला दिशा देऊन, अन्याय झालेल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना प्रयत्नशील आहे. मोकाटे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महिलांचे संघटन झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
ह.भ.प. दिलीप महाराज साळवे म्हणाले की, महिला सर्वच क्षेत्रात आपले कर्तृत्व गाजवत आहे. धार्मिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला कीर्तनकारांचे समाज जागृतीचे कार्य प्रेरणादायी असून, धार्मिकतेला समाजकारणाची जोड देऊन कार्य सुरु आहे. संघटनेचे विचार व ध्येय धोरण पटल्याने महिला वर्ग देखील संघटनेला जोडल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सत्काराला उत्तर देताना हिराबाई मोकाटे यांनी समाजातील महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी महिलांनाच पुढाकार घ्यावा लागणार आहे. सर्व धर्मात महिलांना वंदनीय स्थान असून, देखील महिलांवार वाढते अत्याचार चिंतेची बाब आहे. महिलांचे प्रश्न केंद्रबिंदू ठेऊन पुढील कार्य केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या निवडीबद्दल त्यांचे सर्व राज्य व जिल्हा कमिटीच्या पदाधिकार्यांनी त्यांचे अभिनंदन केले.