• Thu. Mar 13th, 2025

आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत दंत रोग तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

ByMirror

Apr 28, 2023

आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या मानवसेवेच्या कार्याला शासनाच्या वतीने नेहमी सहकार्य -जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ

अहमदनगर (प्रतिनिधी)- आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये सेवाभावाने रुग्णसेवा घडत आहे. या भव्य वास्तूच्या माध्यमातून सुरू असलेली रुग्णसेवा कौतुकास्पद आहे. या मानवसेवेच्या कार्यासाठी शासनाच्या वतीने नेहमी सहकार्य करुन, ही रुग्णसेवा अधिक दर्जेदार व चांगली होण्यासाठी प्रयत्न राहणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी केले.
जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये स्व.डॉ. मदनलालजी मुथा यांच्या स्मरणार्थ मुथा परिवाराच्या वतीने आयोजित मोफत दंत रोग तपासणी शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते. यावेळी स्त्री रोग तज्ञ डॉ. रविंद्र मुथा, कल्पना मुथा, श्रुती वसंत मुनोत, दंतरोग तज्ञ डॉ. प्राची गांधी, डॉ. अर्पणा पवार, संतोष बोथरा, आशिष भंडारी, डॉ. प्रकाश कांकरिया, सुधा कांकरिया, डॉ. वसंत कटारिया, प्रकाश छल्लाणी, निखलेंद्र लोढा, सुभाष मुनोत, अभय गुगळे, सुभाष मुनोत, माणकशेठ कटारिया, वसंत चोपडा आदी उपस्थित होते.


प्रास्ताविकात डॉ. वसंत कटारिया म्हणाले की, काही महिन्यांपूर्वी आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये अद्यावत डेंटल विभाग सुरू झाला आहे. अत्यंत खर्चिक असलेली दंत रोगाची उपचार पद्धती सर्वसामान्यांना कमी खर्चामध्ये उपलब्ध होण्यासाठी या विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आला आहे. उपचार केल्यावर दात वाचू शकतात, मात्र सर्वसामान्यांना हा खर्च पेलवत नसल्याने शेवटी दात काढण्याची वेळ येते. हॉस्पिटलमध्ये या विभागाची कमतरता भरून काढून रुग्णांना सुपर स्पेशलिटी सेवा देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.


दंतरोग तज्ञ डॉ. प्राची गांधी यांनी अत्यल्प दरात रुग्णांना दंत व जबड्यासंबंधी सर्व उपचार आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होणार आहेत. एका सेटिंगद्वारे रूट कॅनल, दातांची कवळी बसविण्याची सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. या विभागात अनुभवी तज्ञ डॉक्टर व ओरल सर्जन उपचारासाठी सज्ज असून, जबड्यांचे, दातांचे व हिरड्यांचे अद्यावत उपचार पध्दतीची माहिती देवून त्यांनी दातांची निगा राखण्याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. अपर्णा पवार यांनी दंत विभागात उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती दिली.


संतोष बोथरा यांनी पाहुण्यांचे स्वागत करून सेवा व सद्भावनेने रुग्णसेवा सुरू आहे. सर्वसामान्यांचा विश्‍वास संपादन करून आरोग्यसेवा दिली जात आहे. मोठ्या शहरातील हॉस्पिटलच्या बरोबरीने अद्यावत आरोग्यसेवा सर्वसामान्यांना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. कल्पना मुथा यांनी या सेवा कार्यात सहभागी होवून मुथा परिवाराने योगदान दिले असून, या सेवाकार्यासाठी नेहमीच सहकार्य राहणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली.


या शिबिरात 180 रुग्णांची मोफत दंत तपासणी करण्यात आली. दंतरोग तज्ञ डॉ. प्राची गांधी व डॉ. अर्पणा पवार यांनी रुग्णांची दंत तपासणी करुन त्यांना मार्गदर्शन केले. शिबिरार्थींना सिरॅमिक कॅप व मेटलकॅप बसविणे, रुट कॅनल, दातांची कवळी बसविणे, दात साफ करणे, दातांमध्ये सिमेंट भरणे आदी उपचार अल्पदरात उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या शिबिरासाठी ओरल सर्जन डॉ. संजय असनानी, डॉ. हरीश सलुजा, डॉ. गौरव पाटील, ऑर्थोडॉन्स्टीस्ट डॉ. कोमल ठाणगे, डॉ. अश्‍विनी पवार, डॉ. राजलक्ष्मी राय, लहान मुलांचे दंतरोग तज्ञ डॉ. प्रणव डुंगरवाल, डॉ. अमृता देडगावकर, एन्डोडॉन्टीस्ट डॉ. पूजा गायकवाड यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष भंडारी यांनी केले. आभार निखेलेंद्र लोढा यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *